Internet User Base: मार्च 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पोहोचली 74.3 कोटींवर; Jio चा वाटा 52.3 टक्के
इंटरनेट | प्रातिनिधिक प्रतिमा | (संग्रहित संपादित प्रतिमा)

मार्च 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची (Internet Users) संख्या 3.4 टक्क्यांनी वाढून, 743 दशलक्ष झाली आहे. टेलिकॉम नियामक ट्रायने (TRAI) या क्षेत्रातील तिमाही कामगिरीवर प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत रिलायन्स जिओ (Reliance Jio) तब्बल 52.3 टक्के बाजारासह पहिल्या स्थानावर आहे, तर भारती एअरटेल (Bharti Airtel) 23.6 टक्के वाटा घेऊन दुसर्‍या स्थानावर आहे. नंतर व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) तिसर्‍या क्रमांकावर आहे. इंटरनेट ग्राहकांच्या संख्येच्या आधारे त्याचा बाजार हिस्सा 18.7 टक्के आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण च्या अहवालानुसार, डिसेंबर 2019 मध्ये संपलेल्या तिमाहीत इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 71.874 कोटी होती, जी मार्च 2020 मध्ये 3.40 टक्क्यांनी वाढून, 74.319 कोटी झाली. यामध्ये वायरलेस इंटरनेट ग्राहकांची संख्या 72.07 कोटी होती, जी एकूण इंटरनेट ग्राहकांपैकी 97 टक्के आहे. त्याच वेळी, वायरसह इंटरनेट वापरणार्‍या ग्राहकांची संख्या 24.4 दशलक्ष होती. अहवालानुसार, एकूण इंटरनेट ग्राहकांपैकी 92.5 टक्के लोक इंटरनेटसाठी ब्रॉडबँड वापरतात.

ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या 68.74 कोटी झाली आहे, तर नॅरोबँड ग्राहकांची संख्या 5.57 कोटी होती. ट्रायच्या 'इंडियन टेलिकॉम सर्व्हिसेस परफॉर्मन्स ऑफ इंडिकेटर, जानेवारी-मार्च 2020' अहवालानुसार, ब्रॉडबँड इंटरनेट ग्राहकांची संख्या मार्च 2020 मध्ये 3.85 टक्क्यांनी वाढून 68.744 कोटी झाली आहे, ती डिसेंबर 2019 मध्ये 66.194 कोटी होती. या अहवालानुसार मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत वायरलेस इंटरनेट ग्राहकांची संख्या 3.51 टक्क्यांनी वाढून 72.07 कोटी झाली आहे. (हेही वाचा: Vodafone-Idea च्या नव्या 5 प्री-प्रेड प्लॅनमध्ये युजर्सला मिळणार G5 चे फ्री सब्सक्रिप्शन, डेटा आणि कॉलिंगची सुविधा)

ट्रायने सांगितले की, एकूण इंटरनेट ग्राहकांपैकी 96.90 टक्के लोक इंटरनेटसाठी मोबाइल वापरतात. तर मार्च 2020 च्या अखेरीस वायरद्वारे इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या केवळ 3.02 टक्के होती. वायरद्वारे इंटरनेट वापरत असलेल्या 2.242 कोटी ग्राहकांपैकी, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा 1.127 कोटी ग्राहकांसह 50.3 टक्के हिस्सा होता. भारती एअरटेलचे 24.7 लाख ग्राहक आहेत.