पाकिस्तानने बनवले फेक Aarogya Setu App; भारतीय युजर्सची माहिती चोरण्याचा होत आहे प्रयत्न, 'अशा' पद्धतीने करू शकाल बचाव
Aarogya Setu App (Photo Credits: Government of India)

एकीकडे भारतासह जगातील सर्व देश प्राणघातक अशा कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढत आहेत. दुसरीकडे, या कोरोना संकटातही पाकिस्तानला (Pakistan) भारताची हेरगिरी करण्याचे नानाविध प्रकार सुचत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने (ISI) भारतीयांची हेरगिरी करण्यासाठी, बनावट आरोग्य सेतु अ‍ॅप (Fake Aarogya Setu App) तयार केले आहे. हे अ‍ॅप एप्रिल 2020 मध्ये विकसित केले गेले. आता या बनावट अॅपची नवीन आवृत्ती बाजारात आली आहे. आयएसआयच्या मदतीने हॅकर्स भारतीय ब्यूरोक्रेसी आणि डिफेंसशी निगडीत संस्थांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या व्यतिरिक्त सामान्य भारतीय नागरिकांनाही या अॅपद्वारे पाकिस्तानी हॅकर्सकडून लक्ष्य केले जात आहे. बनावट आरोग्य सेतू अ‍ॅप हे अगदी खर्‍या अ‍ॅपप्रमाणे दिसतो आणि कार्य करतो. जो कोणी हे बनावट अॅप डाउनलोड केले, तर त्याच्या फोनची सर्व माहिती पाकिस्तानच्या हॅकर्सना उपलब्ध होते. फोन तपशीलांपासून लोकेशनची माहितीही लीक होत आहे. या प्रकरणात सध्या महाराष्ट्र सायबर सेल चौकशी करत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणास नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतु सुरू केले, ज्याला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या देशात कोट्यवधी लोक हे अॅप वापरत आहेत. (हेही वाचा: Aarogya Setu App चा नवा विक्रम; जगातील सर्वात जास्त डाऊनलोड केल्या जाणाऱ्या Top 10 अ‍ॅप्समध्ये समावेश, पहा यादी

बनावट अ‍ॅपद्वारे स्वत: चे असे करा रक्षण –

  • अ‍ॅप हे प्लेस्टोअर किंवा iOS वरूनच डाउनलोड करा.
  •  कोणत्याही अन व्हेरीफायड स्त्रोतावरून किंवा दुव्यावरून आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करू नका.
  • बनावट अ‍ॅपचे एक्सटेंशन फाइल नाव .apk आहे, तर आरोग्य सेतू अ‍ॅचे एक्सटेंशन फाइल नाव gov.in आहे.
  • आपणास जर का कोणी बनावट लिंक पाठवत असेल, तर सायबर सेलला त्वरित कळवा.

केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचार्‍यांना हे अ‍ॅप डाउनलोड करणे बंधनकारक केले आहे. याचाच फायदा घेऊन पाकिस्तानी हॅकर्सनी भारताची हेरगिरी करण्याच्या उद्देशाने बनावट आरोग्य सेतु अ‍ॅप तयार केले. सीएनएन न्यूज 18 च्या अहवालानुसार, महाराष्ट्र सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव म्हणाले की, 'महाराष्ट्र सायबर विभागाला अत्यंत धोकादायक मालवेअरविषयी माहिती मिळाली आहे, ज्यावरून आपल्या देशातील संवेदनशील डेटा चोरीला जाऊ शकतो. काही पाकिस्तानी हॅकर्सनी बनावट आरोग्य सेतु अ‍ॅप तयार केले आहे जेणेकरुन त्यांना संरक्षण अधिकाऱ्यांच्या फोनवरून माहिती मिळू शकेल.’