फेसबुकची (Facebook) एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवा WhatsApp नेहमीच दावा करते की, इथे वापरकर्त्यांचे खासगी संदेश सुरक्षित आहेत, मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहे. आपल्या ‘गोपनीयता वैशिष्ट्यां’चा अभिमान बाळगणाऱ्या या लोकप्रिय चॅटिंग अॅपबद्दल एका नवीन अहवालात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. अहवालात म्हटले आहे की, फेसबुक वापरकर्त्यांचे गोपनीय संदेश वाचण्यासाठी जगभर पसरलेल्या आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना पैसे देत असे. एवढेच नाही तर असेही म्हटले जात आहे की कंपनीने कथितरित्या कायदेशीर संस्थांसह हा डेटा शेअर केला आहे. मात्र, फेसबुकने हे आरोप फेटाळले आहेत.
ProPublica ने मंगळवारी एक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये असा दावा केला जातो की फेसबुकचे हजारो कर्मचारी खासगी किंवा एन्क्रिप्टेड असलेले संदेश वाचत आहेत. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग वारंवार सांगत आहेत की कंपनी लोकांचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचत नाही. 2018 मध्ये त्यांनी अमेरिकन सिनेटसमोर निवेदन दिले होते की, ‘आम्हाला व्हॉट्सअॅपवरील कोणतही कंटेंट दिसत नाही.’
जेव्हा एखादा वापरकर्ता व्हॉट्सअॅपवर खाते उघडतो, तेव्हा त्याला गोपनीयतेबद्दल माहिती दिली जाते. आता अहवालात म्हटले आहे की, ‘ही आश्वासने खरी नाहीत.’ अहवालानुसार, ‘व्हॉट्सअॅपमध्ये एक हजारांहून अधिक कंत्राटी कामगार आहेत जे ऑस्टिन, टेक्सास, डब्लिन आणि सिंगापूरमधील कंपनीच्या कार्यालयीन इमारतींमध्ये वापरकर्त्यांचा कंटेंट तपासतात.’ फेसबुकनेही हे कर्मचारी असल्याचे मान्य केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ज्या कंटेंटवर एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने आक्षेप घेतला आहे, असा कंटेंट हे कर्मचारी तपासतात व त्यांची छाननी करतात.
कंपनीने म्हटले आहे की, अनेक वेळा त्यात फसवणूक आणि चाईल्ड पोर्न पासून ते संभाव्य दहशतवादी षडयंत्रांचा समावेश असतो. अहवालात असे दिसून आले आहे की, जेव्हा वापरकर्ते 'रिपोर्ट' बटण दाबतात, तेव्हा मॉडरेटरला वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश मिळतो. ProPublica सोबतच्या संभाषणात, काही अभियंते आणि व्हॉट्सअॅपच्या मॉडरेटरनी सांगितले की, यामुळे मॉडरेटर युजर्सचे आधीचे पाच संदेश पाहायला मिळतात. यामध्ये फोटो आणि व्हिडिओंचाही समावेश असू शकतो. (हेही वाचा: WhatsApp Update: 1 नोव्हेंबर 2021 पासून 'या' Android आणि iOS Smartphones मध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट होणार बंद; इथे पहा संपूर्ण यादी)
या संदेशांव्यतिरिक्त, कर्मचारी वापरकर्त्याचे व्हॉट्सअॅप ग्रुप, प्रोफाइल पिक्चर, फोन नंबर, स्टेटस मेसेज, फोन बॅटरी लेव्हल, भाषा आणि संबंधित फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाती देखील पाहू शकतात. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, अशाप्रकारे प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज 600 तक्रारींचा सामना करावा लागतो.