Chinese Phones in India: 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चायनीज फोनवर देशात येऊ शकते बंदी; 'ड्रॅगन'ला धक्का देण्याची भारताची तयारी- Report
Smartphone | प्रातिनिधिक प्रतिमा | ( Photo- YouTube)

भारतात चिनी मोबाईल (China Phones) फोन सर्वाधिक विकले जातात. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या मोबाईल फोन्सची स्वस्त किंमत. किफायतशीर किमतीत अनेक फिचरच्या उपलब्धतेमुळे चिनी मोबाईल फोनची भारतीय बाजारपेठेवर मजबूत पकड आहे. मात्र, आता भारत चीनला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे. भारताने याआधीच चीनमधील 300 हून अधिक अॅप्सवर बंदी घातली आहे. आता भारतात चीनच्या काही फोनवर बंदी येऊ शकते. याद्वारे  भारताला आपल्या ढासळत्या देशांतर्गत उद्योगाला चालना द्यायची आहे.

भारत यासाठी चीनचे 12,000 रुपये ($150) पेक्षा कमी किंमतीचे फोन देशात विकण्यापासून चीनी स्मार्टफोन निर्मात्यांना बंदी घालू इच्छित आहे. असे झाल्यास Xiaomi Corp सह अनेक ब्रँडला मोठा धक्का बसेल. चीननंतर भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाइल बाजारपेठ आहे. या प्रकरणाशी परिचित लोकांच्या म्हणण्यानुसार, 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चायनीज फोनवर बंदी घालण्याचे उद्दिष्ट म्हणजे चिनी दिग्गजांना भारतीय फोन बाजारपेठेतून बाहेर काढणे हे आहे. (हेही वाचा: Reliance Jio ने 1,000 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची तयारी केली पूर्ण; 10 पट वाढेल डाउनलोडिंग स्पीड)

भारतीय मोबाइल बाजाराच्या तळाशी सध्या Realme आणि Transsion (Tecno, Itel, Infinix) सारख्य चायनीज ब्रँडची पकड आहे. भारताच्या एंट्री-लेव्हल मार्केटमध्ये जर चिनी मोबाईल फोनवर बंदी घातली, तर Xiaomi सारख्या चिनी ब्रँडला मोठा फटका बसेल. चीनमध्ये एकामागून एक कडक कोविड-19 लॉकडाऊनने त्यांची देशांतर्गत बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली आहे. म्हणून हे चिनी ब्रँड्स अलिकडच्या वर्षांत त्यांची वाढ टिकवून ठेवण्यासाठी भारतावर अधिकाधिक अवलंबून राहिले आहे.

मार्केट ट्रॅकर काउंटरपॉईंटच्या मते, जून 2022 च्या तिमाहीत $150 पेक्षा कमी स्मार्टफोन्सनी भारतातील विक्री व्हॉल्यूमपैकी एक तृतीयांश योगदान दिले. ज्यामध्ये चिनी कंपन्यांचा हिस्सा 80 टक्के होता. सोप्या भाषेत सांगायचे तर, 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत, भारतात विकल्या गेलेल्या एक तृतीयांश फोनची किंमत 12,000 रुपयांपर्यंत होती. त्यातही 80 टक्के चिनी कंपन्यांचे फोन होते. भारत आधीच देशात कार्यरत असलेल्या Xiaomi आणि प्रतिस्पर्धी Oppo आणि Vivo सारख्या चिनी कंपन्यांची चौकशी करत आहे. या कंपन्यांवर करचोरी आणि मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत.