
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने (Jio) सुमारे 1,000 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. जिओने देशातील 1,000 शहरांसाठी 5G नेटवर्क कव्हरेज योजना पूर्ण केल्या आहेत. कंपनीने आपल्या स्वदेशी विकसित 5G दूरसंचार उपकरणांची चाचणी देखील केली आहे. कंपनी त्यांची फायबर क्षमता वाढवण्यासाठी तसेच क्रॉस-साइट चाचण्या चालवण्याचे काम करत आहे, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सादरीकरणादरम्यान सांगितले. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष किरन थॉमस म्हणाले की, कंपनीने भारतात 5G उपयोजनासाठी समर्पित उपायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टीम तयार केल्या आहेत.
सादरीकरणादरम्यान, थॉमस म्हणाले की कंपनी अनेक शहरांमध्ये 5G पायलट प्रकल्प चालवत आहे आणि 3D नकाशे आणि रे ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून 5G लाँच करण्याच्या नेटवर्कच्या योजना सुरू आहेत. नुकत्याच संपलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे. लिलावात लावलेल्या 1.50 लाख कोटी रुपयांच्या बोलींपैकी एकट्या जिओने 88,078 कोटी रुपयांच्या बोली लावल्या होत्या.
कंपनीने सांगितले की, जिओने 5G तंत्रज्ञानाशी संबंधित सेवांची देखील चाचणी केली आहे. यादरम्यान ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR), व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR), क्लाउड गेमिंग, टीव्ही स्ट्रीमिंग, संलग्न रुग्णालये आणि औद्योगिक उपयोगाची चाचणी घेण्यात आली. दूरसंचार विभागाचे म्हणणे आहे की 5G स्पेक्ट्रमवर आधारित सेवा सुरू केल्याने, 4G पेक्षा 10 पट वेगाने डाउनलोड करता येईल. त्याच वेळी, स्पेक्ट्रमची कार्यक्षमता देखील सुमारे तीन पटीने वाढेल. (हेही वाचा: जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! रिलायन्स जिओ देणार भारतात सर्वात स्वस्त 5G इंटरनेट सेवा)
लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी 71 टक्के विक्री झाली आहे. लिलावात जिओची सर्वाधिक भागीदारी होती. ही सेवा सुरु झाल्यानंतर दूरसंचार कंपन्या त्यांच्या इच्छेनुसार सेवांची किंमत ठरवू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, कंपन्या 5G टॅरिफवर अधिक शुल्क आकारू इच्छितात. एका अहवालानुसार, कंपन्या सध्याच्या 4 जी पेक्षा सरासरी 4 टक्क्यांनी शुल्क वाढवू शकतात.