Chandrayaan 3 Mission Update: चंद्रावर सूर्योदय,  Vikram lander आणि Pragyan rover पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता
Chandrayaan-3 | (Photo Credits: Twitter )

Vikram Lander and Pragyan Rover Likely to Reactivate: अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर चंद्रयान-3 (Chandrayaan-3) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्यानंतर चंद्रावर सुर्यास्त झाला आणि ते उर्जा संपल्याने निद्रावस्थेत गेले. असे असले तरी चंद्रावर आता पुन्हा सुर्योदय होऊ घातला आहे. तिथे पाहाट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रोवर आणि लँडर पुन्हा सक्रीय होतात का याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

इस्त्रो चंद्रयान-3 मोहिमेवर बारकाईन नजर ठेऊन आहे. चंद्रावर पुरेसा प्रकाश झाला तर पुन्हा एकदा नवी अपडेट मिळू शकते, संवादाचे नवे द्वार खुलू शकते, अशी इस्त्रोला खात्री वाटते आहे. दरम्यान, चंद्रावर पहाट झाल्यामुळे, ISRO आता आपल्या चंद्र मोहिमेचा चंद्रयान-3 च्या सौरऊर्जेवर चालणार्‍या लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संप्रेषण पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रहावर म्हणजेच चंद्रावर रात्र होण्यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला 4 आणि 2 सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हर दोन्ही स्लीप मोडवर गेले होते. जे आता पुन्हा सक्रीय होण्याची आशा आहे.

चंद्रावर प्रचंड प्रमाणात गारठा आहे. तापमान जवळपास -200 अंश सेल्सिअस इतके असते. त्यामुळे अशा थंडीत स्वत:ला टिकवून ठेणे आणि पुन्हा सक्रीय करणे हे ‘प्रज्ञान आणि विक्रम’ यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, चंद्रावरील तापमान वाढले आणि ते कायम राहिल्यास दोन्ही मॉड्यूल पुन्हा सक्रीय होऊ शकतात. त्यांना पुरेसा प्रकाश मिळाला तर पुढील चौदा दिवस चंद्रावरून माहिती पाठविण्याचे त्यांचे कार्य सुरू ठेवू शकतात. जर गोष्टी योजनेनुसार चालल्या तर, रोव्हरमध्ये कमांड टाकल्यानंतर रोव्हर हालचाल करण्यास सुरवात करेल. लँडर मॉड्यूलवर पुढे कायम हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल.

इस्रोचे माजी अध्यक्ष के सिवन म्हणाले, चांद्रयान-3 चांद्र मोहिमेचा दुसरा टप्पा प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरच्या प्रबोधनाने सुरू होणार असल्याने आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. चंद्रावरची रात्र तर आता संपली आहे. त्यामुळे चंद्रावर आता दिवस सुरु होतो आहे. त्यामुळे लँडरला पुरेसा प्रकाश मिळाला तर ते पुन्हा कार्यन्वीत होतील.