चांद्रयान 2 च्या मोहिमेतील ऑर्बिटर उलगडणार चंद्रावरील अंधाराचे रहस्य
चंद्रयान-2 (Photo Credits: ISRO Video)

चंद्राच्या (Moon) पृष्ठभागावर लॅन्ड केलेल्या विक्रम लॅन्डर (Vikram Lander) सोबत अद्याप इस्रोकडून (ISRO) संपर्क झालेला नाही. त्यामुळे इस्रोकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु चांद्रयान 2 (Chandrayaan 2) च्या मोहिमेतील ऑर्बिटर (Orbiter) चंद्रावरील अंधाराचे रहस्य उघडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जगाला चंद्रावरील एक नवीन रहस्याचा उलगडा होणार आहे. वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, भारताच्या चांद्रयान मधील पहिल्या मोहिमेपेक्षा आताच्या मोहिमेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

इस्रोचे माजी चेअरमॅन एसएस किरण कुमार यांनी असे म्हटले की, आम्ही चांद्रयान 1 पेक्षा अधिक अपेक्षा या मोहिमेकडून करत आहोत. तसेच माइक्रोवेव ड्यूल-फ्रिक्वेंसी सेंसर्सच्या मदतीने चंद्राच्या अंधारातील भागाचे निरिक्षण करणे शक्य होणार आहे. त्याचसोबत ऑर्बिटरमध्ये मोठे स्पेक्ट्रल रेंज असलेले दमदार कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

ऑर्बिटरने चंद्राच्या कक्षेत आधीच प्रवेश केला असल्याने चंद्रावरील प्रवास, पृष्ठभागावरील संचरचना, खनिज आणि पाण्याची उपलब्धता किती आहे याबाबत रहस्य उलगडणार आहेत. त्यामुळे ऑर्बिटर 7 वर्षापर्यंत येथील माहिती आणि अधिक रहस्य समोर आणण्यास मदत करणार आहे.(Chandrayaan 2: NASA चे ऑर्बिटर धाडणार विक्रम लँडरचा फोटो, 17 सप्टेंबर पर्यंत करावी लागेल प्रतीक्षा)

परंतु इस्रोकडे आता विक्रम लॅन्डर सोबत पुन्हा संपर्क साधण्यासाठी फक्त सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. तर चंद्रावर रात्र होणार असल्याने त्यावेळी प्रचंड कडाक्याची थंडी असते या वातावरणात लँडर, रोव्हर काम करू शकणार नाही. तसेच या दोन्ही यंत्रणांची निर्मिती ही केवळ 14 दिवसाच्या कार्यक्षमतेवर करण्यात आली आहे त्यामुळे 21 सप्टेंबर पर्यंत संपर्क न झाल्यास या मोहिमेच्या पूर्ण यशाच्या आशा मावळू शकतात.