Chandrayaan 2: NASA चे ऑर्बिटर धाडणार विक्रम लँडरचा फोटो, 17 सप्टेंबर पर्यंत करावी लागेल प्रतीक्षा
'विक्रम' लैंडर (Photo Credits: IANS)

चांद्रयान-2 (Chandrayaan 2) अगदी शेवटच्या टप्प्यात असताना विक्रम लँडरशी (Vikram Lander) संपर्क तुटल्याने या महत्वकांक्षी मोहिमेच्या यशाची स्वप्ने मावळली होती. मात्र त्यांनतर चांद्रयानाच्या ऑर्बिटरने विक्रम लँडर सुरक्षित आहे असा संदेश देणारा एक फोटो पाठवला आणि या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. असं असलं तरीही अद्याप विक्रम विषयी कोणताही निष्कर्ष काढता आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) ने सुद्धा पुढाकार घेऊन विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर चंद्राभोवती भ्रमण करत आहे 17 सप्टेंबर रोजी हा ऑर्बिटर सध्या विक्रम असलेल्या जागेवरून जाणार आहे. यावेळी नासाच्या ऑर्बिटर मधून विक्रम लँडरचा फोटो काढण्यात येणार असल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. यामुळे विक्रमची सद्य स्थिती काय आहे हे समजायला इस्रोच्या वैज्ञानिकांना मदत होऊ शकते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार, नासाने यापूर्वी जेपीएल प्रयोगशाळेच्या 70 मीटर अँटेनाच्या सहाय्याने विक्रमला हॅलो असा संदेश पाठवला होता मात्र यावर सुद्धा काहीच प्रतिक्रिया आली नाही. मात्र आता नासाच्या ऑर्बिटरच्या मदतीने निदान विक्रम लँडरची स्थिती जाणून घेता येईल.इस्रोचे वैज्ञानिक बंगळुरू येथील डीप स्पेस नेटवर्क सेंटरच्या 32 मीटर अँटिनाच्या साहाय्याने तसेच जेपीएलच्या 70 मीटर अँटिनाच्या मदतीने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे पण अजूनही विक्रमतर्फे कोणताच प्रतिसाद आलेला नाही. (दुर्दैवाने विक्रम लँडरशी संपर्क होऊ न शकल्यास, Chandrayaan-3 साठी ISRO चा असेल मास्टर प्लॅन; घ्या जाणून)

दरम्यान हा तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी इस्रोच्या हातात केवळ आठ दिवस आहेत. यानंतर चंद्रावर रात्र होणार असल्याने त्यावेळी प्रचंड कडाक्याची थंडी असते या वातावरणात लँडर, रोव्हर काम करू शकणार नाही. तसेच या दोन्ही यंत्रणांची निर्मिती ही केवळ 14 दिवसाच्या कार्यक्षमतेवर करण्यात आली आहे त्यामुळे 21 सप्टेंबर पर्यंत संपर्क न झाल्यास या मोहिमेच्या पूर्ण यशाच्या आशा मावळू शकतात.