दुर्दैवाने विक्रम लँडरशी संपर्क होऊ न शकल्यास, Chandrayaan-3 साठी ISRO चा असेल मास्टर प्लॅन; घ्या जाणून
Indian Space Research Organisation (Photo Credits: ISRO/Twitter)

इस्रोचे (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्रयान-2 (Chandrayaan-2) मिशन पूर्णतः यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आज सहा दिवस होऊनही विक्रम लँडरशी (Vikram Lander) कोणताही संपर्क होऊ शकला नाही. मात्र दुर्दैवाने हा संपर्क झालाच नाही तर, इस्रोने पुढच्या योजनेचा विचार सुरु केला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकला नाही तर, पुन्हा एकदा विक्रम लँडर आणि रोव्हरची अपडेटेड आवृत्ती चंद्रयान-3 (Chandrayaan-3) मधून चंद्रावर पाठवली जाईल. चंद्रयान-3 मिशनमध्ये चंद्रावर जाणारे लँडर आणि रोव्हर उत्तम सेन्सर, शक्तिशाली कॅमेरे, अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली आणि अधिक सामर्थ्यशाली संप्रेषण प्रणालीसह सुसज्ज असतील.

असेही सांगितले जात आहे की, चंद्रयान-3 च्या सर्व भागात बॅकअप कम्युनिकेशन सिस्टम देखील स्थापित केला जाऊ शकते, जेणेकरून कोणत्याही अनुचित घटनेच्या बाबतीत या सिस्टमचा वापर केला जाऊ शकेल. युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोसेटा मिशनचे सदस्य असलेले डॉ. चैतन्य गिरी म्हणतात, ‘जेव्हा एखादी अंतराळ संस्था एखाद्या ग्रहावर मिशन पाठवते तेव्हा त्याचे तीन टप्पे असू शकतात. प्रथम ऑर्बिटर मिशन असते. दुसर्‍यामध्ये यान योग्य ठिकाणी (पृष्ठभाग) उतरण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिसर्‍यामध्ये नमुना परतावा मिशनचा समावेश असतो. यात रोबोटच्या मदतीने तेथील माती पृथ्वीवर आणली जाते. अशा प्रकारे चंद्रयान-3 मोहीम 100 टक्के यशस्वी होण्याच्या शक्यता जास्त आहेत. (हेही वाचा: चंद्राच्या पृष्ठभागावर जोरदार आदळूनही विक्रम लँडर पूर्णतः सुरक्षित)

असे म्हटले जात आहे की, जपानची अंतराळ संस्था जॅक्सा (JAXA) देखील भारतीय अवकाश एजन्सी इस्रोच्या चंद्रयान -3 अभियानास मदत करू शकते. यासाठी ते आपला सर्वात शक्तिशाली रॉकेट एच-3 वापरणार आहे. तथापि, हे रॉकेट सध्या तयार केले जात आहे. मात्र इस्रोने अजूनतरी चंद्रयान-3 मोहिमेबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चंद्रयान-3 मिशन, चंद्रयान-2 मधून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारेच पूर्ण होईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चंद्रयान -3 ची संभाव्य तारीख 2024 होती, परंतु आता असे दिसते की या मिशनमध्ये थोडा उशीर होऊ शकतो.