भारतीयांसाठी आनंदाची बातमी: चंद्राच्या पृष्ठभागावर जोरदार आदळूनही विक्रम लँडर पूर्णतः सुरक्षित; संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू
'विक्रम' लैंडर (Photo Credits: IANS)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर (Vikram Lander) सध्याची स्थिती शोधून काढली आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावर अनेकवेळा आपटल्यानंतरही विक्रम लँडर सुरक्षित आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, विक्रम लँडर कोणत्याही बाजूने तुटला नाही. दुसरीकडे, लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ अद्यापही सतत करीत आहेत. चंद्रयान-2 लँडर 'विक्रम' चा संपर्क चंद्र पृष्ठभागापासून फक्त 2.1 किमी उंचीवर असताना तुटला. अशाप्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे लँडिंग करण्याच्या भारताच्या धाडसी प्रयत्नाला शनिवारी पहाटेच मोठा धक्का बसला.

इस्रोचे प्रमुख के. सीवन यांनी रविवारी सांगितले होते की, चंद्राच्या कक्षेभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरने विक्रमची थर्मल छायाचित्रे काढली आहेत. सीवन यांच्या  म्हणण्यानुसार, अद्याप त्यांचा विक्रमशी संपर्क झालेला नाही, यासंदर्भात इस्रोचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की,  लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने धडक दिली आहे आणि यामुळे ते वळले आहे. आता त्याची स्थिती वरच्या दिशेला दर्शविली जात आहे. (हेही वाचा: Chandrayaan 2 बाबत के.सिवन यांनी दिली मोठी आशादायक बातमी; ISRO ला विक्रम लॅन्डर चा शोध लागला; संपर्क प्रस्थापित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू)

शनिवारी, चांद्रयान-2 लँडर विक्रमची चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद लँडिंगची मोहीम अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. चंद्र पृष्ठभागापासून केवळ 2.1 किमी अंतरावर ग्राऊंड स्टेशनशी त्यांचा संपर्क तुटला होता. दरम्यान, चंद्रयान-2 लँडरचे वजन 1,471 किलो आहे. लँडरची रचना पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह (चंद्र) वर 'अलगद लँडिंग' करण्यासाठी आणि एक चंद्र दिवस (पृथ्वीवरील सुमारे 14 दिवसांच्या समतुल्य) काम करण्यासाठी करण्यात आली होती.