AI Supercomputer: पुण्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता सुपर कम्प्युटर ‘ऐरावत’ ची मोठी कामगिरी; पटकावले जगभरातील सुपर कम्प्युटर्सच्या यादीत 75 वे स्थान
Artificial Intelligence (File Image)

पुण्यात, सी-डॅक संस्थेत स्थापन करण्यात आलेला कृत्रिम बुद्धिमत्ता सुपर कम्प्युटर (AI Supercomputer) ‘ऐरावत’ने (Airawat) जगभरातील सुपर कम्प्युटर्सच्या यादीत, 75 वे स्थान पटकावले आहे. जर्मनीत काल झालेल्या 61 व्या आंतरराष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग परिषदेत, जागतिक सुपर कम्प्युटरची सूची जारी करण्यात आली. यात जगभरातील सर्वोत्तम 500 सुपरकॉम्प्युटर्स मध्ये भारताचा ऐरावत 75 व्या स्थानी आहे.

तसेच, कृत्रिम बुद्धीमत्ता सुपर सुपरकॉम्प्युटिंग देशांच्या यादीत, भारत सर्वोच्च स्थानी आहे. केंद्र सरकारच्या कृत्रिम बुद्धीमत्ता विषयक राष्ट्रीय अभियानाअंतर्गत ही सुपरकॉम्प्युटिंग प्रणाली विकसित आणि स्थापन करण्यात आली आहे.

‘आपल्याला कृत्रिम बुद्धीमत्ता भारतात निर्माण करायची आहे आणि कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित काम भारतासाठी करायचे आहे’- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता’ हा दृष्टिकोन यासंदर्भात बोलतांना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव, अल्केश शर्मा यांनी संगितले, ‘डिजीटल युगातील कृत्रिम बुद्धीमत्ता हे सर्वाधिक आशादायी तंत्रज्ञान आहे. भारताकडे प्रचंड डेटा उपलब्धता, भक्कम डिजिटल अर्थव्यवस्था आणि कुशल कार्यशक्ती यामुळे, कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी एक भक्कम व्यवस्था आणि स्पर्धात्मकता यांचा लाभ होत आहे. (हेही वाचा: Virtual Girlfriend: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर Caryn Marjorie स्वतःच्या व्हर्च्युअल गर्लफ्रेंड च्या रूपातून कमावतेय 41 कोटी दरमहा)

भारताने आपल्या नैसर्गिक भाषा प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग, पॅटर्नची ओळख, कृषी, वैद्यकीय इमेजिंग, शिक्षण, आरोग्य, ऑडीओ सहाय्य, रोबोटिक्स आणि महत्वाच्या क्षेत्रांसाठी विकसनशील उपाययोजना, अशा सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरु केला आहे. भारत, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर नागरिकांना तसेच संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि समाज तसेच अर्थव्यवस्थेसमोर असणाऱ्या महत्वाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पुढेही करत राहील, जेणेकरून जग, आपल्या वास्तव्यासाठी आणखी चांगली जागा बनू शकेल, असेही शर्मा यांनी सांगितले.