अदानी समूह (Photo Credit : Youtube)

भारतामध्ये आता अजून एक कंपनी दूरसंचार सेवा उपलब्ध करू शकणार आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह देशभरात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा देऊ शकतो. अदानी डेटा नेटवर्कला सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवांसाठी परवाना मिळाला आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अदानी समूहाने अलीकडेच 5जी (5G) स्पेक्ट्रमच्या लिलावात भाग घेऊन दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. आता सूत्रांनी अदानी समूहाची कंपनी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (ADNL) ला युनिफाइड टेलिकॉम परवाना दिल्याची माहिती दिली आहे.

सूत्रांनी सांगितले की, ‘अदानी डेटा नेटवर्क्सला UL (AS) परवाना मिळाला आहे. सोमवारी हा परवाना जारी करण्यात आला. मात्र, अदानी समूहाने यासंदर्भात पाठवलेल्या ई-मेलला प्रतिसाद दिलेला नाही. 5जी स्पेक्ट्रम खरेदी करताना कंपनीने सांगितले होते की, ते या स्पेक्ट्रमचा समूहातील व्यावसायिक क्रियाकलापांसाठी वापर करेल. अदानी समूहाने असेही सांगितले होते की, त्यांच्या डेटा सेंटर्ससाठी तसेच सुपर अॅपसाठी एअरवेव्ह वापरण्याची त्यांची योजना आहे, जे त्यांच्या व्यवसायांना समर्थन देईल.

अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेडने नुकत्याच झालेल्या 5जी स्पेक्ट्रम लिलावात 400 MHz स्पेक्ट्रम 20 वर्षांसाठी 212 कोटी रुपयांना विकत घेतले होते. अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड हे अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​एक युनिट आहे. नवीन खरेदी केलेल्या 5जी स्पेक्ट्रममुळे अदानी समूहाच्या पायाभूत सुविधा, प्राथमिक उद्योग आणि B2C व्यवसाय पोर्टफोलिओच्या डिजिटायझेशनला गती देणारे एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात मदत होईल, असे समूहाने एका निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा: iPhone 5G Update: आयफोन युजर्सना 5जी मिळवण्यासाठी करावी लागेल प्रतीक्षा; जाणून घ्या कधी जारी होईल अपडेट)

दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून देशात 5जी सेवा सुरू करण्यात आली आहे. एअरटेल (Airtel) 6 ऑक्टोबरपासून देशातील 8 शहरांमध्ये 5जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. ही शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी आहेत. त्याच वेळी, जिओ (Jio) ने दसऱ्यापासून मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये 5जी टेस्टिंग सुरू केल्या आहेत.