5G Spectrum | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

5G Services in India: देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये (India Mobile Congress) 5G सेवा सुरू करणार आहेत. लॉन्च झाल्यानंतर लोकांची 5G सेवेची प्रतीक्षा संपणार आहे. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने आज ट्विट करून ही माहिती दिली आहे. भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रदर्शन इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये भारतात 5G सेवा सुरू करतील, असे त्यात म्हटले आहे.

इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये होणार मेगा लॉन्च -

इंडिया मोबाइल काँग्रेस हे आशियातील सर्वात मोठे दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच मानले जाते. हे दूरसंचार विभाग (DoT) आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे. 5G तंत्रज्ञान सुरू झाल्यामुळे भारताला खूप मोठा फायदा होणार आहे. मोबाइल नेटवर्क ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जागतिक उद्योग संस्थेचा अंदाज आहे की, 2023 ते 2040 दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला 36.4 ट्रिलियन रुपये किंवा $455 अब्जचा फायदा होईल. (हेही वाचा - Instagram Down: जगभरात इंस्टाग्राम डाऊन! शेवटी इंस्टाग्रामने सादर केला जाहीर माफीनामा)

5G सेवेचा काय फायदा होईल?

5G सेवेमध्ये डेटा पाठवण्याचा आणि प्राप्त करण्याचा वेग पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होणार आहे. यामुळे लोकांचा वेळ तर वाचेलच, पण नव्या युगातील अनेक अॅप्लिकेशन्सही सहज वापरता येतील. 5G च्या मदतीने, ग्राहकांचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल. तसेच आता कोणत्याही ऑनलाईन व्यवहारासाठी, फाइल्स डाउनलोड किंवा अपलोड करण्यासाठी अगदी कमी वेळ लागेल.

5G दूरसंचार सेवांद्वारे, उच्च दर्जाचे दीर्घ व्हिडिओ किंवा चित्रपट काही सेकंदात मोबाइल आणि इतर उपकरणांवर डाउनलोड केले जाऊ शकतात. 5G सेवेची सुपरफास्ट गती (4G पेक्षा सुमारे 10 पट वेगवान), कनेक्टिव्हिटी विलंब कमी करते आणि कोट्यवधी कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवर रीअल-टाइम डेटा शेअरिंग सक्षम करते.

दरम्यान, भारतीय ग्राहकांना लवकरच निवडक शहरांमध्ये 5G सेवा मिळणे सुरू होणार आहे. पुढील 12-18 महिन्यांत त्यांचा व्यापक प्रसार दिसून येणार आहे. 5G सेवा शिक्षण देण्याच्या पद्धतीत बदल करू शकते. अगदी दुर्गम भागातही, शिक्षक किंवा गेस्ट लेक्चररांना पॉवर्ड होलोग्रामद्वारे जोडून किंवा मिश्र-वास्तविक सामग्री वर्गात प्रसारित करून शिक्षण दिले जाऊ शकते.