U.S. States Sue Meta: फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे मुलांमध्ये वाढत आहे डिप्रेशन; अमेरिकेमधील 33 राज्यांनी मेटाच्या मालकावर दाखल केला खटला
Instagram, Facebook (PC - Pixabay)

टेक कंपनी ‘मेटा’ (Meta) आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जगभरात वेगाने विस्तार करत आहे. जगभरात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण दिवसभर फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामसारखी (Instagraam) व्यासपीठे वापरत असतात. मात्र ही बाब मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) चांगली नाही. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेटाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. म्हणूनच अलीकडे अमेरिकन राज्यांनी यावर कठोर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कसह 33 यूएस राज्यांनी, ‘जाणूनबुजून तरुणांना हानी पोहोचवल्याबद्दल’ आणि ‘इन्स्टाग्राम आणि ‘फेसबुकवर मुलांना या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करणारी फीचर्स जाणूनबुजून डिझाइन करून त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम केल्याबद्दल’, मेटावर खटला दाखल केला आहे.

या 33 राज्यांच्या वतीने कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात दावा केला आहे की, मेटा फेडरल कायद्याचे उल्लंघन करून पालकांच्या संमतीशिवाय 13 वर्षाखालील मुलांकडून डेटा नियमितपणे गोळा करत आहे. याशिवाय नऊ अॅटर्नी जनरल आपापल्या राज्यात खटले दाखल करत असून, एकूण कारवाई करणाऱ्या राज्यांची संख्या 41 वर पोहोचली आहे.

दाखल केलेल्या खटल्यानुसार, मेटाने तरुण आणि किशोरांना आकर्षित करण्यासाठी शक्तिशाली तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जास्तीत जास्त नफा मिळवणे हा त्याचा उद्देश आहे. मेटाने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या महत्त्वपूर्ण जोखमींबद्दल वारंवार जनतेची दिशाभूल केली आहे. या प्लॅटफॉर्मने किशोर आणि मुलांचे शोषण आणि हेरफेर करण्याचे मार्ग लपवले आहेत. या खटल्याद्वारे आर्थिक नुकसान भरपाई आणि मेटाच्या कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या पद्धती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

न्यू यॉर्कचे अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स म्हणाले की, इंस्टाग्राम आणि फेसबुकमुळे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे आणि याला मेटासारख्या सोशल मीडिया कंपन्या जबाबदार आहेत. मेटाने जाणूनबुजून धोकादायक फीचर्ससह प्लॅटफॉर्म डिझाइन करून मुलांच्या वेदनांचा फायदा घेतला आहे. यामुळे मुले त्यांच्या व्यासपीठावर व्यसनाधीन होतात आणि त्यांचा आत्मसन्मान कमी होतो. (हेही वाचा: Elon Musk: Meta नंतर मस्कने Wikipedia सोबत घेतला पंगा; म्हणाले, नाव बदलले तर एक अब्ज डॉलर देईन)

याबाबत मेटाने म्हटले आहे की, ते किशोरांना एक सुरक्षित व्यासपीठ प्रदान करते. किशोरवयीन आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी कंपनीने आधीच 30 हून अधिक साधने सादर केली आहेत. कंपनीने पुढे म्हटले आहे की, खटला भरण्याऐवजी, अॅटर्नी जनरलने अशा अॅप्स वापरण्यासाठी किशोरवयीन मुलांसाठी वय निश्चित करण्यासाठी उद्योग कंपन्यांसोबत काम करावे. अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या मते, अमेरिकेतील 13 ते 17 वयोगटातील जवळजवळ सर्व किशोरवयीन मुले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात.