अर्जुन आणि सारा यांच्या बनावट ट्विटर अकाउंटने त्रस्त सचिन तेंडुलकर याने ट्विटरवर पोस्ट शेअर करत केली 'ही' मागणी, वाचा सविस्तर
अर्जुन, सारा आणि सचिन तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

आजकाल भारताचा महान खेळाडू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपला मुलगा अर्जुन (Arjun) आणि मुलगी सारा (Sara) बद्दल खूप चिंताग्रस्त आहे. सचिनने मुलगा अर्जुन आणि मुलगी साराच्या बनावट खात्याबद्दल ट्वीट केले असून, त्याने ट्विटरवरून ही बनावट खाती चालवणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपला मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा सोशल मीडिया साइट ट्विटरवर नसल्याचे सचिनने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ट्विटरवर युवा क्रिकेटपटू अर्जुन आणि साराच्या नावावर बरीच अकाउंट्स झाली आहेत, परंतु सचिनने म्हटले आहे की सर्व बनावट आहेत. सचिनने टॅग केलेले खाते अर्जुन तेंडुलकर याचे अधिकृत खाते म्हटल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच 'ऑफिशियल, डाव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज, देवाचा पुत्र' असं त्याच्या बायोमध्ये लिहिलेले आहे. सचिनच्या मुलाच्या नावावर बनावट खात्याच्या कव्हर आणि प्रोफाइलमध्ये अर्जुन तेंडुलकरचा फोटो आहे.

सचिनने लिहिले, "मला हे स्पष्ट करायचे आहे की माझा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा ट्विटरवर नाहीत. हे खाते (ट्विटर हँडल) अर्जुनला चुकीच्या पद्धतीने व्यक्त करत आहे आणि सेलिब्रिटी आणि संस्थांबद्दल चुकीच्या गोष्टी पोस्ट करत आहे. यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मी ट्विटरला विनंती करतो."

दरम्यान, यापूर्वीही सचिनने आपला मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा ट्विटरवर नसल्याचे सांगितले होते. 20 वर्षीय अर्जुनने मुंबईतर्फे अंडर-14, अंडर-16 आणि 19 वर्षाखालील संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तो दक्षिण विभाग, द्वितीय इलेव्हन चँपियनशिपचा देखील भाग होता. दुसरीकडे, 22 वर्षीय साराने अलीकडेच लंडनमधून आपले शिक्षण पूर्ण केले.