Tokyo Olympics 2020: अनपेक्षित ऑलिम्पिक पदकाची आशा जागवणारी Aditi Ashok कोण आहे? जाणून घ्या तिच्याबद्दल रंजक गोष्टी
गोल्फर अदिती अशोक (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: टोकियो (Tokyo) येथे आयोजित खेळाचे महाकुंभ आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचले आहे. नेमबाजी आणि तिरंदाजी दल पदक मिळवण्यात अपयशी ठरले, तर पुरुष आणि महिला हॉकी संघांनी इतिहास रचला. भारताच्या खात्यात आतापर्यंत पाच पदके जमा झाली आहेत तर हॉकी आणि कुस्तीच्या सामन्यांवर सर्वांच्या नजरा असताना, एक खेळाडू आहे जी गुप्तपणे काम करत पदकाच्या अगदी जवळ आली आहे. शुक्रवारी अदिती अशोकने (Aditi Ashok) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतासाठी पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. तिसऱ्या फेरीच्या समाप्तीनंतर ती दुसऱ्या स्थानावर कायम आहे. अदिती ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. ऑलिम्पिक खेळातील भारतासाठी हे एक ‘सरप्राईज’ पदक ठरू शकते. गोल्फ खेळातून कदाचितच देशवासीयांनी पदकाची अपेक्षा केली असेल. (Tokyo Olympics 2020: फायनल शो साठी टीम इंडिया सज्ज; 7 ऑगस्ट रोजी 3 ऑलिम्पिक पदके पणाला; पाहा दिवसाचे संपूर्ण शेड्युल)

23 वर्षीय अदितीने तिसऱ्या फेरीनंतर 5 बर्डी घेऊन 12-अंडर 201 वर दुसऱ्या स्थानावर आली. ती अमेरिकेची गोल्फर आणि जगातील पहिल्या क्रमांकाची गोल्फर नेली कोरडा हिच्या 1 स्ट्रोक मागे आहे. अदितीची टी-3 वर 2-स्ट्रोक आघाडी असून तिथे चार गोल्फर तिच्या बरोबरीत आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडची लिडिया को, ऑस्ट्रेलियाची हॅना ग्रीन, डेन्मार्कची एमिली क्रिस्टीन पेडरसन आणि मोने इनामी यांचा समावेश आहे. आता खेळाच्या 15व्या दिवशी अदितीच्या कामगिरीवर संपूर्ण देशाची नजर असेल. अदिती जर यशस्वी ठरली तर भारतासाठी हे नक्कीच आश्चर्यकारक पदक ठरेल. दरम्यान, भारतासाठी आश्चर्य पदकाची दावेदार बनलेल्या अदिती अशोकबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घ्या.

1. अदिती वयाच्या 18 व्या वर्षी 2016 च्या रिओ गेम्समध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण गोल्फर (पुरुष किंवा महिला) होती.

2. रेस्टॉरंटच्या खिडकीतून गोल्फर्सना खेळताना पाहताना तिला वयाच्या 5 व्या वर्षी पहिल्यांदा खेळाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर जेव्हा खेळाला व्यावसायिकदृष्ट्या पाठिंबा देण्याची वेळ आली तेव्हा तिचे वडील अदितीचे वडील तिच्यामागे मजबुतीने उभे राहिले. त्यांनी तिचा कॅबी म्हणूनही काम केले.

3. अदिती ही आशियाई युवा खेळ (2013), युवा ऑलिम्पिक खेळ (2014), आशियाई खेळ (2014) तसेच ऑलिम्पिक खेळ (2016) मध्ये भाग घेणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला गोल्फर आहे.

4. लल्ला आयचा टूर स्कूलचे विजेतेपद पटकावणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे. या कामगिरीमुळे तिला 2016 च्या सीझनसाठी लेडीज युरोपियन टूर कार्डचे तिकीट मिळाले.

5. 2017 मध्ये ती पहिली भारतीय महिला प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन (LPGA) खेळाडू बनली. लुईस सुग्स रुकी ऑफ द इयर स्टँडिंगमध्ये तिने 8 वे स्थान मिळवले.

6. युरोपियन टूर आणि 2 पीजीए चॅम्पियनशिपमध्ये 14 पदके मिळवणारा Rory Mcllroy अदितीचा आवडता गोल्फर आहे.