Tokyo Olympics 2020: भारताने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात इतिहास रचला आहे. 23 वर्षीय भालाफेक प्रकारात नीरज चोपडाने (Neeraj Chopra) ‘सुवर्ण’ कामगिरी करत देशासाठी पहिले गोल्ड मेडल पटकावले आहे. भालाफेकमध्ये (Javelin) नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर तर दुसऱ्यामध्ये 87.58 मीटर, तिसऱ्या वेळी 76.79 मीटर लांब भाला फेकून इतिहास रचला आहे. नीरजने यासह ट्रॅक अँड फील्डमध्ये ऑलिम्पिक पदकासाठी स्वतंत्र भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रानंतर (Abhinav Bindra) पहिले एकेरी सुवर्ण पदक ठरले आहे. टोकियो ऑलिम्पिक खेळातील भारताचे हे पहिले सुवर्ण तर सातवे पदक ठरले आहे. नीरजनंतर झेक प्रजासत्ताकच्या भालाफेकटूंनी रौप्य व कांस्यपदक पटकावले आहे. 87.58 मीटरभाला फेकत नीरजने ऑलिम्पिकच्या ट्रॅक अँड फील्ड प्रकारात सुवर्ण कामगिरीची नोंद केली आहे.
दुसरीकडे, तसेच नीरजपूर्वी कुश्तीपटू बजरंग पुनियाने खेळात चौथे कांस्य तर कुश्ती प्रकारात दुसरे पदक जिंकले आहे. पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी 8-0 असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 5-12 ने पराभूत झाला होता. दरम्यान, आजच्या ऑलिम्पिकच्या ‘सुपर शनिवारी’ बजरंग आणि नीरजच्या रूपात भारताने आणखी दोन पदके जिंकली आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमधील आपल्या पदकांच्या एकूण संख्येला मागे टाकत धमाकेदार कामगिरी बजावली. लंडन ऑलिम्पिक खेळात भारताने 2 रौप्य आणि 4 कांस्य पादकांसह एकूण 6 पदके जिंकली होती पण टोकियो खेळात टीम इंडियाने एक पाऊल पुढे टाकले आणि 7 पदकांची नोंद केली आहे. भारतीय संघाची ऑलिम्पिक खेळातील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
टोकियो येथे आयोजित खेळात महाकुंभमध्ये भारतासाठी चोप्राव्यतिरिक्त वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, बॉक्सिंगमध्ये लवलीना बोर्गोहेनने कांस्य, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने देखील कांस्यपदक भारताच्या पदरात पाडले. तर कुस्तीमध्ये रवी दहियाने रौप्य आणि बजरंग पुनियाने कांस्य व पुरुष हॉकी संघाने 41 वर्षाची ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आंत ऐतिहासिक कांस्यपदक पदकाची कमाई केली आहे.