Tokyo Olympics 2020: हरियाणा सरकारकडून रौप्यपदक विजेत्या Ravi Dahiya वर बक्षिसांचा वर्षाव; 4 कोटी रुपये, नोकरीसह खट्टर सरकारकडून 'या' घोषणा
रवी कुमार दहिया (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने (Ravi Dahiya) 57 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. मात्र, तो सुवर्णपदक जिंकू शकला नाही आणि इतिहास रचण्यापासून चुकला. अंतिम सामन्यात रशियन कुस्तीपटूने त्याला पराभवाची धूळ चारली. हरियाणा सरकारने (Haryana Government) गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 रौप्यपदक विजेता रवी कुमार दहिया याला चार कोटी रुपये आणि वर्ग 1 श्रेणीतील नोकरी देण्याची घोषणा केली. तसेच त्याला हरियाणामध्ये जिथे पाहिजे तिथे 50% सवलत देऊन भूखंड दिला जाईल जिथे कुस्तीसाठी एक इनडोअर स्टेडियम त्याच्या गावी नहरी येथे बांधण्यात येईल, अशा बक्षिसांचा पाऊसच हरयाणा सरकारने आपल्या वीरपुत्रावर केला. भारताने टोकियो क्रीडा स्पर्धेत आपले दुसरे रौप्य पदक मिळवले. यापूर्वी, भारोत्तोलक मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो गटात दुसरे स्थान पटकावले होते. (Tokyo Olympics 2020: रवी दहियाच्या हातून निसटला ‘गोल्डन’ चांस, रशियन जगज्जेत्याने अंतिम सामन्यात 7-4 ने दिला धोबीपछाड; भारताच्या पदरी दुसरे रौप्यपदक)

रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना 7-4 ने जिंकला. युगुयेवने सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि कुस्तीमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकण्याची संधी दिली नाही. त्यामुळे रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र असं असलं तरी रवीने केलेली कामगिरी ही ऐतिहासिक ठरली असून आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे. दरम्यान, दहियाने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पाचवे पदक (दोन रौप्य, तीन कांस्य) मिळवून दिले. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला सुशील कुमार ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारा आणखी एक भारतीय कुस्तीपटू आहे. त्याने 2008 बीजिंग खेळात कांस्य आणि 2012 लंडन ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक पटकावले होते. विशेष म्हणजे सुशील कुमारने सलग दोनदा ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकले आहेत.

शिवाय, केडी जाधवने 1952 च्या हेलसिंकी गेम्समध्ये कांस्य जिंकले होते. तसेच 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत साक्षी मलिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू बनली होती.