
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा (Maharashtra State Olympic Games) 2 जानेवारीपासून राज्यातील नऊ वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू होणार आहेत. 2 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. पुढील 10 दिवसांत सुमारे 8,000 खेळाडूंमध्ये, 39 क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा होतील. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर 24 स्पर्धा होणार आहेत. पहिल्या दिवशी कुस्ती (पुणे), सॉफ्टबॉल (जळगाव), बॅडमिंटन (नागपूर) आणि योगासन (नाशिक) या प्रकारांमध्ये खेळाडू आणि संघ आमनेसामने येतील. बारामती, औरंगाबाद, अमरावती, मुंबई आणि सांगली ही इतर यजमान शहरे आहेत.
अधिकृत उद्घाटन सोहळा 5 जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (MOA) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकार 22 वर्षांनंतर या खेळांचे आयोजन करत आहे.
स्पर्धेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेला संबोधित करताना, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील खेळाडू दरवर्षी विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय क्रमांक मिळवतात. आमच्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक स्तरावरही जिंकण्याची प्रतिभा आहे.’ पुण्याचे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी सांगितले, ‘पुणे ही आपल्या देशाची क्रीडा राजधानी आहे. त्यामुळेच आम्ही येथे अशा सुंदर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत आहोत. आमच्या राज्यातील सर्व प्रतिभावान खेळाडू एका अनोख्या अनुभवासाठी एकत्र येतील आणि त्यांची उत्कृष्टता दाखवतील.’
या स्पर्धेत तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जीम्नॅस्टीक्स्, हँडबॉल, हॉकी, ज्युडो (मुले व मुली), कबड्डी, खो-खो, लॉन टेनिस, मॉडर्न पेंटॅथलॉन, शुटींग, रोविंग, रग्बी, स्वीमिंग-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वाँडो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टींग, रेस्टलींग, वु-शू, सायकलिंग (रोड व ट्रॅक), नेटबॉल, सेपक-टक्रॉ, स्क्वॅश, मल्लखांब, शुटींग बॉल, सॉफ्टबॉल, योगासने, सॉफ्ट टेनिस, रोलर स्केटींग, यॉटींग, गोल्फ आणि कॅनाईंग-कयाकिंग या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी आजपासून सुरु, कशी असेल प्रक्रिया, जाणून घ्या वेळापत्रक)
जिल्हानिहाय होणाऱ्या स्पर्धा –
पुणे-ॲथलेटिक्स,फूटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग,स्क्वॅश, बॉक्सींग, हॉलीबॉल, रोलर स्केटींग,गोल्फ, सॉप्ट टेनिस,
नागपूर- बॅडमिंटन,नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा
जळगांव – खो-खो,सॉप्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल
नाशिक- रोईंग,योगासन
मुंबई- याटींग, बास्केटबॉल
बारामती- कबड्डी
अमरावती- आर्चरी,
औरंगाबाद – तलवारबाजी
सांगली कनाईंग-कयाकिंग अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे जतन करणे व क्रीडा वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जात्मक खेळ पाहण्याची संधी नागरिक व नवोदित खेळाडू यांना उपलब्ध व्हावी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याचा नावलौकीक व अधिक पदके प्राप्त व्हावीत, यासाठी राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे व स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहेत. क्रीडा स्पर्धेसाठी 19.08 कोटी रुपये व जिल्हा वार्षिक योजनेतून 11.51 कोटी रुपये असे एकूण 30.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.