रविचंद्रन अश्विन (Photo Credit: IANS)

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आयपीएल (IPL) मध्ये बऱ्याच काळ महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. अश्विनने त्याच्या शानदार गोलंदाजीने संघाला 2010 आणि 2011 मध्ये विजेतेपद मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. याच्यानंतर अश्विनने 2018 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाचे कर्णधारपद सांभाळले. त्याच्या नेतृत्वात पंजाबने प्ले-ऑफ फेरी गाठली नसली तरीही संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. पण, अश्विन दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात सामील होणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरु होती, आणि आता याबाबत सर्व औपचारिकता पूर्ण झाली असून लवकरच अधिकृतपणे घोषणा केली जाईल असे वृत्त समोर येत आहे. पंजाबचे सह-मालक नेस वाडिया यांनी याला अफवा म्हटले असले तरी दिल्लीने पुढच्या मोसमासाठी अश्विनसह करार केला असल्याचे म्हटले जात आहे. (IPL 2020: आयपीएल खेळाडूंचा लिलाव येत्या 19 डिसेंबरला, कोलकाता शहराला प्रथमच संधी)

अश्विन लवकरच आयपीएलमध्ये दिल्लीच्या कॅपिटल्ससह नवीन इनिंग्सची सुरुवात करण्यासाठी आता सज्ज आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की फ्रँचायझीने अश्विनला संघात शामिल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून नजीकच्या काळात त्याची घोषणा केली जाईल. अधिकाऱ्याने म्हणाले, "हो, अश्विनला जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आम्ही लवकरच याची घोषणा करू. यापूर्वी, अश्विनसह अदला-बदल करण्यासाठी पंजाबला दिल्ली संघाचा योग्य खेळाडू न मिळाल्याने ही चर्चा लांबली. आता त्यांना अश्विनच्या बदल्यात ते दोन खेळाडू मिळत आहेत आणि करार 99 टक्के पूर्ण झाला आहे."

अश्विनच्या नेतृत्वात पंजाबने मागील दोन मोसमातील पहिल्या हाल्फमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. पंजाब संघाने 2018 मध्ये सातवा आणि 2019 मध्ये सहावा क्रमांक मिळविला. दरम्यान, आता अश्विन संघातून बाहेर पडल्याने पंजाब संघाचे कर्णधारपद के एल राहुल (KL Rahul) याच्याकडे सोपवले जाऊ शकते. याची पुष्टीही पंजाबच्या सूत्रांनी देखील केली. त्याने सांगितले की, हो, ज्येष्ठ खेळाडूंपैकी एक असल्याने राहुलला संघाचा कर्णधारपदी नियुक्त केले जाण्याची अधिक शक्यता आहे आणि त्याला संघाच्या कमकुवतपणा आणि सामर्थ्याबद्दल अधिक माहिती आहे.