Nirbhaya Case Convicts | File Image

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी (Nirbhaya Case) अखेर चारही आरोपींना आज फाशी देण्यात आली आहे. चारही दोषींना 20 मार्च 2020 रोजी पहाटे 5.30 वाजता फाशी दिली गेली. निर्भयाला 7 वर्ष आणि 3 महिन्यांनंतर अखेर न्याय मिळाला आहे. 2012 रोजी दिल्लीतील निर्भयावर क्रूरपणे बलात्कार करून हत्या करणाऱ्या पापी नराधमांचा अखेर अंत झाला आणि उशिरा का होईना निर्भयाला न्यायव्यवस्थेनं न्याय दिला. नराधमांनी 7 वर्षांमध्ये फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. नराधमांना फाशी दिल्यानंतर तिहार जेलबाहेर (Tihar Jail) नागरिकांनी तिरंगा फडकवून निर्भयाला न्याय दिल्याचा समाधान व्यक्त केलं. सोशल मीडियावर सामान्य नागरिकांपासून राजकीय, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी आनंद व्यक्त केला. दक्षिण आशियातील सर्वात मोठा तुरूंग परिसर असलेल्या 16,000 हून अधिक कैदी असलेल्यातिहार तुरूंगात पहिल्यांदाच चार जणांना एकत्र फाशी देण्यात आली. (Nirbhaya Case Convicts Hanged: निर्भया च्या फोटोला मिठी मारून रडल्या आशा देवी; आरोपींच्या फाशीनंतर दिल्लीवासियांनी तिहार जेल बाहेर केले 'असे' सेलिब्रेशन)

भाजपचे खासदार आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर, फोगाट भगिनी आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त आणि नेमबाज हिना सिद्धू (Heena Sidhu) यांनी नराधमांच्या फाशीवर प्रतिक्रिया दिली. सर्वांनी फाशीमध्ये उशीर झाल्याचेही मान्य केले. नराधमांना फाशी दिल्यानंतर सर्व स्तरातून निर्भयाला आज श्रद्धांजली वाहिली जात आहे.

गंभीर म्हणाला की,"मृत्यूपर्यंत फाशी! शेवटी! मला माहित आहे आम्हाला उशीर झाला आहे निर्भया!

7 वर्षानंतर न्यायाचा सूर्य उगवला!! गीता फोगाट म्हणाली.

बबिता फोगाटने लिहिले, "निर्भया न्याय दिन, चारही नराधमांना फाशी देण्यात आली"

दोषींनी केलेल्या कायदेशीर उपाययोजनांच्या गैरवापर दूर करण्यासाठी सध्याच्या न्यायव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी लोकांना या प्रकरणातून धडा घेण्याची हिनाने आव्हान केले.

निर्भयाचे दोषी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह यांनी मागील दोन महिन्यातच तब्बल तीन वेळा कायदेशीर मार्गाने पळवाट काढण्याचा प्रयत्न करत फाशी पुढे ढकलली होती. यावर निर्भयाच्या आईने न्यायालयासमोर नाराजी व्यक्त केली होती, यावर उलट दोषीच्या वकिलांनी आशा देवी यांनीच मोठेपणा दाखवून या चौघांची फाशी रद्द करायला सांगावी असा सल्लाही दिला होता.