महिला टी-20 विश्वचषकात (Women's T20 World Cup) दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंडने (England) पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजविरुद्ध आपापल्या गटातील ब गटात विजय मिळवला आणि उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. अ-गटात अव्वल स्थानावर राहिलेल्या भारताने (India) यापूर्वी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. आता चौथा संघाचा निर्णय आज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील होणाऱ्या सामन्याच्या निकालाने होईल. रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 17 धावांनी पराभूत केले.त्यानंतर इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 46 धावांनी विजय मिळविला. इंग्लंडचा हा तिसरा विजय आहे आणि ग्रुप बीमध्ये रन-रेटच्या आधारावर अव्वल स्थान मिळवले आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेचा अद्याप वेस्ट इंडिजविरुद्ध अजून एक सामना शिल्लक आहे. या सामन्यानंतर ग्रुप-बी मधील क्रमवारी निश्चित होईल. (Women's T20 World Cup 2020: राधा यादव नंतर शेफाली वर्मा ने खेळला तुफानी डाव, श्रीलंकेला 7 विकेटने पराभूत करत भारत लीग स्टेजमध्ये अजिंक्य)
भारताने लीग फेरीत सर्व सामने जिंकले आणि 8 गुणांसह ग्रुप अमध्ये अव्वल स्थान मिळवले. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोघांचे सध्या 4-4 गुण आहेत, मात्र सरासरीच्या आधारावर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. रविवारी झालेल्या सामन्यांमधील दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये आफ्रिकी टीमने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 136 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकाकडून लाउरा वूल्वार्डने सर्वाधिक 53 धावा केल्या. लाउराचे विश्वचषकमधील दुसरे अर्धशतक होते. पाकिस्तानकडून डायना बेगने दोन विकेट घेतल्या तर अनाम अमीन, अइमान अनवीर, सैयदा शाह आणि निदा डार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये पाच विकेट गमावत फक्त 119 धावांपर्यंत मजल मारता आली.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने आपल्या दमदार कामगिरीने वेस्ट इंडिजला 46 धावांनी पराभूत केले आणि सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली. इंग्लंडने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावून 143 धावा केल्या. त्याच्याकडून नॅटली सायव्हर 57 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 17.1 ओव्हरमध्ये अवघ्या 97 धावांवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजकडून से ली एन किर्बीने सर्वाधिक 20 धावा केल्या. याव्यतिरिक्त, ब्रिटनी कपूर आणि स्टेफनी टेलरने 15-15 धावा केल्या.