IND vs ENG ICC T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, भारतीचा सामना इंग्लंडशी (IND vs ENG) होईल. दोन्ही संघांमधला हा सामना आज 27 जून रोजी रात्री 8 वाजता गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला जाईल. पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला गेला जिथे दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदांच स्थान मिळवले. दरम्यान, चालू मोसमात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाला आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे. तर गतविजेता इंग्लंड संघ सलग दुसऱ्या सत्रात अंतिम सामन्यात प्रवेश करू इच्छित आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG Semi-Final 2 Weather Update: भारत- इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचे सावट! सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?)
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सरासरी इतक्या केल्या आहेत धावा
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 39 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत विराट कोहलीने 39.93 च्या सरासरीने आणि 135.66 च्या स्ट्राईक रेटने 639 धावा केल्या आहेत. दरम्यान, विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 80 धावांसह 5 अर्धशतके झळकावली आहेत. इंग्लंड व्यतिरिक्त वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया हे देश आहेत ज्यांच्याविरुद्ध विराट कोहलीने 500 हून अधिक धावा केल्या आहेत.
टी-20 विश्वचषकात विराट कोहलीची इंग्लंडविरुद्ध अशी आहे कामगिरी
टीम इंडियाचा घातक फलंदाज विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. या कालावधीत विराट कोहलीने 45.00 च्या सरासरीने आणि 125.00 च्या स्ट्राइक रेटने 90 धावा केल्या आहेत. 2012 च्या मोसमात विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 32 चेंडूत 40 धावांची खेळी केली होती. टीम इंडियाने तो सामना 90 धावांनी जिंकला. 2022 च्या मोसमात विराट कोहलीने 40 चेंडूत 50 धावांची खेळी केली होती. इंग्लंड संघाने तो सामना 10 विकेटने जिंकला.
सध्याच्या मोसमात विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने चालू मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे. आतापर्यंत विराट कोहलीला 6 डावात 11.00 च्या निराशाजनक सरासरीने आणि 100.00 च्या स्ट्राइक रेटने केवळ 66 धावा करता आल्या आहेत. दरम्यान, विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 37 आहे, जी बांगलादेशविरुद्ध केली होती. विराट कोहलीला 2 डावात खातेही उघडता आले नाही. विराट कोहली एका मोसमात 2 सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.