
Team India: टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा (Team India) नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने टी-20 आणि वनडे संघात अनेक बदल केले आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता भविष्याकडे पाहत असल्याचे दिसून येते. सलामीवीर केएल राहुलकडून (KL Rahul) वनडे संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. एवढेच नाही तर केएल राहुलला टी-20 संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या मर्यादित षटकांमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
हार्दिक पांड्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनण्याचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीचे कर्णधारपद सोडल्यानंतर टीम इंडियाने अनेक दिग्गज खेळाडूंना कर्णधार म्हणून आजमावले पण काही निष्पन्न झाले नाही. युवा खेळाडू ऋषभ पंत, शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांना कर्णधार म्हणून संधी देण्यात आली होती, परंतु ते सर्व भारतीय निवडकर्त्यांना प्रभावित करू शकले नाहीत.
हार्दिक पांड्याला जेव्हा-जेव्हा कर्णधारपदाची संधी मिळाली, तेव्हा तो चांगला खेळला. गेल्या वर्षभरात कर्णधारपदाव्यतिरिक्त हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही खूप छाप पाडली आहे. सर्वप्रथम, हार्दिक पांड्याला गेल्या वर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स फ्रँचायझीचा कर्णधार बनवण्यात आले होते. यानंतर हार्दिक पांड्याने पदार्पणाच्या मोसमातही दणका दिला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात पहिल्याच सत्रात चॅम्पियन ठरला.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी टीम इंडियाने 4 सामने जिंकले आहेत तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. हार्दिक पांड्याच्या विजयाची टक्केवारी 100% आहे. अलीकडेच हार्दिक पांड्याने न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाला 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 असा विजय मिळवून दिला. आयपीएलमधील त्याच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे तर त्याने 15 पैकी 11 सामने जिंकले आहेत. संघाला 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दुसरीकडे, टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलला वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 4 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची संधी मिळाली होती, मात्र त्या चारही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर केएल राहुलने झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला. राहुलने या वर्षात 7 वनडेमध्ये कर्णधारपद भूषवले.
केएल राहुलने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान, टीमने 7 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाला 4 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आयपीएलमध्ये केएल राहुलने 42 पैकी 20 सामने जिंकले आहेत, तर 20 सामने हरले आहेत, तर 2 सामने बरोबरीत आहेत.