T20 World Cup 2021: सराव सामन्यात टीम इंडियाच्या उत्कृष्ट खेळानंतरही विराट-धोनी काळजीत, निर्माण झाल्या तीन मोठ्या समस्या
रोहित शर्मा व केएल राहुल (Photo Credit: PTI)

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 च्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये टीम इंडियाने (Team India) जोरदार कामगिरी केली. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियावर देखील भारी पडला. दोन्ही सामन्यांमध्ये संघाच्या फलंदाजांची कामगिरी अतिशय चांगली होती. केएल राहुल (KL Rahul), ईशान किशन, रोहित शर्मा (Rohit Sharma) या तिघांनी सराव सामन्यात जोरदार धावा लुटल्या. इंग्लंडविरुद्ध गोलंदाजांची कामगिरी निश्चितच निराशाजनक होती, पण भारतीय गोलंदाजांनी कांगारू फलंदाजांना खूप त्रास दिला. मात्र, हार्दिक पांड्याला फॉर्ममध्ये परतण्याची फारशी संधी मिळाली नाही. खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे विराट आणि मार्गदर्शक धोनीसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आता टीम मॅनेजमेंटपुढे भारताच्या कोणत्या 11 धुरंधरांना पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरवावे याचा पेच उभा राहिला आहे. (T20 World Cup 2021: MS Dhoni याने Rishabh Pant याला दिले विकेटकिपिंगचे धडे, व्हिडिओ व्हायरल)

रोहित शर्माचा जोडीदार कोण?

इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात नाणेफेक दरम्यन कोहली म्हणाला होता की केएल राहुल सलामीवीर म्हणून रोहितसोबत मैदानावर उतरेल, पण किशनने त्याच सामन्यात ज्याप्रकारे गोलंदाजांची धुलाई केली, त्याने निश्चितपणे कोहलीला विचार करण्यास भाग पडले असेल. राहुलने दोन्ही सराव सामन्यांमध्ये त्याने खूप चांगली फलंदाजी केली. पण, विराट-माहीपुढे समस्या अशी आहे की ईशानच्या कामगिरीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

हार्दिक पंड्याच्या संघात स्थान देणार?

कोहलीपुढील दुसरी समस्या म्हणजे हार्दिकला सराव सामन्यांमध्ये जास्त फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही आणि जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत तो विशेष लयीत दिसला नाही. हार्दिक गोलंदाजी करत नाही आणि तो संघात फिनिशर म्हणून खेळेल असा विश्वास आहे. अशा परिस्थितीत विराट-माही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कसे बसवतील? जर हार्दिकला फलंदाज म्हणून संघात खेळायचे असेल, तर फॉर्म बघता ईशान किशन त्याच्यापेक्षा चांगला पर्याय असल्याचे दिसत आहे. राहुल-रोहित सलामीला उतरले तर किशन फिनिशरची भूमिका बजावू शकतो. म्हणजेच, हार्दिकचा पत्ता प्लेइंग इलेव्हनमधून कट होताना दिसत आहे.

शार्दुल ठाकूर की भुवनेश्वर कुमार?

इंग्लंडविरुद्ध भुवनेश्वर कुमारने दोन्ही हाताने धावा लुटल्या आणि चार षटकांत 54 धावा दिल्या. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध या वेगवान गोलंदाजाने जबरदस्त पुनरागमन केले आणि चार षटकांत केवळ 27 धावा देऊन स्टिव्ह स्मिथची विकेट घेतली. दुसरीकडे, शार्दुलने कांगारू संघाविरुद्ध चेंडूने फारसा काही प्रभाव पाडला नाही, पण त्याचा अलीकडचा फॉर्म खूप चांगला आहे. शार्दुलच्या बाजूने जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे तो फलंदाजीनेही प्रभावी ठरू शकतो. आयपीएल 2021 मध्ये शार्दुलने चेन्नईसाठी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली. अशा परिस्थितीत, शार्दुलच्या अलीकडील फॉर्मचा विचार करून भुवीच्या अनुभवावर दाव लावायचा की नाही याचा विचार विराटला करावा लागेल.