Racism in Cricket: मंकीगेट ते जोफ्रा आर्चरसोबत गैरवर्तन; क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाच्या 'या' घटनांनी खेळभावनेला पोहचवली हानी
हरभजन सिंह-अँड्र्यू सायमंड्स (Photo Credit: Getty)

कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह इतर देशातही वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवला जात आहे. 25 मे रोजी घडलेल्या या घटनेचे पडसाद आता संपूर्ण अमेरिकेत पसरत आहेत. जॉर्जला न्याय मिळावा यासाठी अमेरिका (America) समेत जागतिक पातळीवरही या घटनेचा निषेध केला जात आहे. या दरम्यान, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू क्रिस गेलनेही क्रिकेटमध्ये वर्णद्वेष होत असल्याचं म्हटलं आणि यामुळे वर्णद्वेषाचा मोठा वादविवाद पुन्हा एकदा जगासमोर उपस्थित झाला आहे. या जुन्या भेदभाव पद्धतींना दफन केले गेले असूनही, यासारख्या घटना असामान्य नाहीत. जगभरात सामंजस्याचे शक्तिशाली संदेश पाठविणाऱ्या खेळ विश्वात वर्णद्वेषाचे असे अनेक प्रकार घडले आहेत आणि क्रिकेट त्यामधील एक आहे. क्रिकेटच्या मैदानावरही याआधी अनेकदा वर्णद्वेषाच्या घटना घडल्या आहेत. (George Floyd Death: डॅरेन सॅमी याची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICC कडे मागणी, क्रिकेट मंडळांनीही केले आवाहन)

वेळोवेळी क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाच्या काही कुरुप घटना घडल्या ज्याने खेळभावनेला हानी पोहचवली आहे. इथे आपण पाहूया क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाच्या काही घटना ज्यांनी क्रिकेट विश्वाला हादरून टाकले.

जोफ्रा आर्चर गैरवर्तन

क्रिकेटमधील सर्वात ताजं उदाहरण हे इंग्लंडकडून खेळणाऱ्या आर्चरचे आहे. मागील वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर आर्चरला कसोटी सामन्यात वर्णद्वेषी टिपण्णी ऐकावी लागली होती. आर्चरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्या व्यक्तीविरोधात कारवाई करत त्याच्यावर 2 वर्षासाठी स्टेडियममध्ये येऊन सामने पाहण्यास बंदी घातली.

डोडा गणेश

भारताचा माजी वेगवान गोलंदाज दोडा गणेशने आपल्या खेळाच्या दिवसात वर्णद्वेषाचा सामना करावा लागला असल्याचे उघड केले. "अभिनव मुकुंद यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वर्णद्वेषाबद्दल खुलासामुळे आपल्या काळात त्याने काय भोगले याचा विचार करण्यास उद्युक्त केले," असे गणेश म्हणाले. गणेश म्हणाले की, त्यावेळी त्यांना वर्णद्वेषाची कल्पना नव्हती आणि भविष्यात कोणत्याही भारतीयांनी अशा प्रकारच्या परीक्षेत जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.

क्रिस गेल

गेलसारख्या नावाजलेल्या व लोकप्रिय खेळाडूनेही वंशवादाचा आपला वाईट अनुभव मांडला आहे. तो म्हणतो की आपल्यालासुध्दा वंशवादाचा सामना करावा लागला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी टी-20 स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला आपल्या वर्णावरुन बऱ्याचदा आपल्याला लक्ष्य केले गेले असे त्याने म्हटले.

मंकीगेट

अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंहमध्ये झालेले हे प्रकरण क्रिकेटमधील सर्वात नावाजलेल्या प्रकारणांपैकी एक आहे. सिडनी कसोटी सामन्यात सायमंड्सने हरभजनवर त्याला 'वानर' म्हटल्याचा आरोप केला परंतु भारतीय फिरकी गोलंदाजाने त्याला नकार दिला. या घटनेनंतर हरभजनवर तीन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती पण भारतीय संघाने दौर्‍यावरुन माघार घेण्याची धमकी दिल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला.

मॉन्टी पनेसर

2013-14 अ‍ॅशेस डाऊन अंतर्गत मोन्टी पनेसरचा दुसर्‍या कसोटी सामन्यात समावेश होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पगडी आणि दाढी असलेल्या चार शीखांची प्रतिमा पोस्ट केली आणि ट्विटमध्ये लिहिले,"‘कृपया खरा मोंटी पनेसार उभा राहील का? #अ‍ॅशेस." या ट्विटने प्रचंड गोंधळ उडाला, ते ट्विट हटविण्यात आले आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलगिरी व्यक्त करावी लागली.

दरम्यान, जॉर्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांविरोधात सैन्यदल रस्त्यावर उतरवण्याचा इशारा दिला आहे. जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूप्रकरणात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेवरही अमेरिकेत संताप व्यक्त होतो आहे.