भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट टीममधील सामने नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणार्थ राहिल्या आहेत. 31 मार्च 2001 रोजी इंदोरच्या (Indor) नेहरू स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात असाच एक क्षण पाहायला मिळाला ज्याने एकदिवसीय क्रिकेटची रूप-रेखाच बदलून टाकली. 19 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी खेळल्या सामन्यात क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) इतिहास रचला होता. सचिनने या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले. त्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने 19 चौकारांच्या मदतीने तुफानी शतक ठोकले. सचिनचे केलेला तो रेकॉर्ड 17 वर्षानंतर एका भारतीय क्रिकेटपटूनेच मोडला. भारताचा कर्णधार विराट कोहली ने वेस्ट इंडिजविरुद्ध 2018 मध्ये 157 धावांचा धाव खेळला आणि वनडे इतिहासात सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज बनला. (On This Day! 26 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सचिन तेंडुलकरने वनडे कारकिर्दीत पहिल्यांदा केली ओपनर म्हणून सुरुवात, ऑकलँडमध्ये खेळला होता दमदार डाव)
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने सचिनच्या 139 धावांच्या जोरावर 8 विकेट्स गमावून 299 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. त्याला व्हीव्हीस लक्ष्मणने चांगली साथ दिली. लक्ष्मणने 88 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. सचिनने एकदिवसीय सामन्यातील 28 वे शतक ठोकले. या सामन्यापूर्वी दहा हजारी गाठण्यासाठी 4 धावांची आवश्यकता होती आणि महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या चेंडूवर त्याने हा पराक्रम केला. भारताने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघ 181 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने 118 धावांनी सामना जिंकला. एडम गिलख्रिस्ट वगळता कोणत्याहीऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. गिलक्रिस्टने 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 63 धावा केल्या. रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वॉ यांनी 23-23 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, भारताकडून हरभजन सिंह, अजित आगरकरने प्रत्येकी 3-3 तर श्रीनाथला 2 विकेट मिळाल्या.
दरम्यान, फक्त 10,000 हजारच नाही तर 11,000, 12,000, 13,000, 14,000, 15,000, 16,000, 17,000 आणि 18,000 वनडे धावांचा टप्पा गाठणारा सचिन पहिला फलंदाज आहे. वनडे कारकिर्दीत सचिन एकूण 18,426 धावा केल्या आहेत, यात 49 शतकं आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे.