IPL 2021: दुसऱ्या टप्प्यात KKR, पंजाब आणि राजस्थानचे भाग्य बदलणार का? टॉप-4 च्या शर्यतीत संघात होणार काट्याची टक्‍कर
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांना संघर्ष करावा लागला. आयपीएल पॉइंट टेबलमध्ये राजस्थान 5 व्या, तर पंजाब किंग्स 6 व्या आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ 7 व्या स्थानावर आहे. अशास्थितीत त्यांना बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी किमान 5 सामने जिंकावे लागतील. राजस्थान आणि कोलकाताचे संघ गेल्या दोन आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये (IPL Play-Off) स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत, तर पंजाबने 2014 मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. (IPL 2021 in UAE: सिंगापूरचा ‘हा’ क्रिकेटपटू बदलणार विराट कोहलीच्या RCB चे भाग्य? 19 षटकारांसह ठोकल्या 282 धावा)

राजस्थानच्या अडचणीत वाढ

राजस्थानने पहिल्या टप्प्यात सात पैकी तीन सामने जिंकले आहेत, तर चार गमावले आहेत. सध्या राजस्थानच्या समस्या वाढल्या आहेत. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे खेळणार नाही तर जोस बटलरने आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले आहे. संघाचा मुख्य अष्टपैलू बेन स्टोक्स मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे अनिश्चित काळासाठी विश्रांतीवर आहे. राजस्थानने बटलरच्या जागी न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्सचा समावेश केला आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा मनगट फिरकीपटू तबरेज शम्सीचा समावेश केला आहे. शम्सी सध्या टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तसेच सीपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा स्फोटक फलंदाज एविन लुईस देखील राजस्थानचा एक भाग बनला आहे. कर्णधार संजू सॅमसनने पहिल्या टप्प्यात राजस्थानसाठी सर्वाधिक 277 धावा केल्या आहेत. त्यामुळे संघाला त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्याचबरोबर आयपीएल 2021 चा सर्वात महागडा खेळाडू क्रिस मॉरिसने 7 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय 'द हंड्रेड'मध्ये जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

पंजाबची मदार राहुलवर

केएल राहुल गेली चार वर्षे आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. यंदा आयपीएलमध्ये राहुलने पहिल्या लेगमध्ये चार अर्धशतकांच्या मदतीने 331 धावाही केल्या आहेत. मात्र राहुल वगळता पंजाबची फलंदाजी अत्यंत कमकुवत आहे. मयंक अग्रवालने धावा करत आहे पण त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. अलीकडेच संपलेल्या स्फोटक टी-20 फलंदाजा क्रिस गेलने काही चांगली खेळी खेळली असली तरी गेल त्याचा नावाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. तसेच डेविड मलान बाहेर पडल्याने पंजाब संघाला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय पंजाबची गोलंदाजीही कमकुवत दिसत आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झे रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ यांनी स्वत:ला उपलब्ध घोषित केले नाही. पंजाबने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला आपल्या संघात सामील केले आहे, ज्याने पदार्पणाच्या टी-20 सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. मालनच्या जागी संघात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करामचा समावेश आहे.

कर्णधार बदलूनही नाही बदलले कोलकात्याचे भाग्य

कोलकाताची स्थिती सर्वात वाईट आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात कोलकाता संघाने सातपैकी 5 सामने गमावले तर फक्त दोन सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षी आयपीएलच्या मध्यावर दिनेश कार्तिकच्या जागी इयन मॉर्गनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली पण तो अद्याप संघाचे भवितव्य बदलू शकलेला नाही. फलंदाजीतही मॉर्गन योगदान देऊ शकला नाही. मॉर्गनने या आयपीएलच्या 7 सामन्यांमध्ये केवळ 92 धावा केल्या आहेत. याशिवाय केकेआरचा सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्सने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले आहे. कमिन्सच्या जागी दोन वेळा चॅम्पियन केकेआरने किवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीचा समावेश केला आहे. कोलकातासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी सीपीएलमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर शाकिब अल हसन देखील न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्यानंतर फॉर्ममध्ये परतला आहे. टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवडलेल्या वरुण चक्रवर्तीकडून संघाला मोठ्या आशा असतील. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये चक्रवर्तीने 15 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या होत्या.