India Tour of Australia 2020: 17 डिसेंबरपासून खेळली जाईल भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान टेस्ट मालिका, असे असू शकते टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रक
टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

India Tour of Australia 2020: कोरोना महामारी सुरू झाल्यापासून भारतीय क्रिकेट चाहते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तळमळत आहेत. जून महिन्यात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकटला सुरुवात झाली आहे. इंग्लंड-विंडीज मालिकेनंतर, इंग्लंड-पाकिस्तान आणि त्यानंतर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दरम्यान मालिका आयोजित केली गेली, परंतु भारतीय खेळाडूंना आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळू शकली नाही. आता, एका अहवालानुसार, आयपीएल (IPL) 2020 नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर (India Tour of Australia) येईल तेव्हा पुन्हा चाहत्यांनाआंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आनंद घेण्याची संधी मिळेल, ज्याचे वेळापत्रक आता निश्चित झाले आहे. ESPNCricinfoच्या अहवालानुसार भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान डिसेंबर महिन्यात 17 तारखेपासून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. 'बॉक्सिंग डे' कसोटी (Boxing Day Test) 26 डिसेंबरच्या पारंपारिक तारखेपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) खेळली जाईल, त्यानंतर अ‍ॅडिलेड येथे गुलाबी-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) खेळली जाईल.

दरम्यान, 7 जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणारा दुसऱ्या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान आठवडाभराच्या अंतरांच्या बीसीसीआयच्या विनंतीस ऑस्ट्रेलियाने मान्य केले आहे. ब्रिस्बेन येथे कसोटी मालिकेतील अंतिम सामना 15 जानेवारी रोजी आयोजित केला जाईल. याशिवाय, कसोटी मालिकेपूर्वी तीन सामन्यांची वनडे मालिका ब्रिस्बेन येथे सध्या मिळालेल्या तारखांनुसार 26, 28 आणि 30 नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाईल. त्यानंतर 4, 6 आणि 8 डिसेंबर रोजी अ‍ॅडिलेडयेथे टी-20 मालिका खेळली जाईल. आयपीएलसाठी आधीच तयार असलेल्या दुबई बायो-बबलमधून संपूर्ण संघ बाहेर पडेल.

10 नोव्हेंबर रोजी आयपीएल फायनलनंतर 25 ते 27 सदस्यांची टीम ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रवाना होईल आणि त्यांच्या 14-दिवसांच्या क्वारंटाइन कालावधी दरम्यान त्यांना सराव करण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया दुसऱ्यांदा पिंक-बॉल कसोटी मालिका खेळेल. यापूर्वी, मागील वर्षी बांग्लादेशविरुद्ध भारतीय टीमने पहिली गुलाबी टेस्ट खेळली ज्यात त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी कसोटी त्यांच्यासाठी सोप्पी नसेल कारण कांगारू टीमने आजवर 8 गुलाबी कसोटी मालिका खेळली असून ते अजेय राहिले आहेत.