India Legends Vs Sri Lanka Legends: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या नेतृत्वात इंडिया लेजेन्ड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-20 2021च्या अंतिम सामन्यात श्रीलंका लेजेन्ड्सला 14 धावांनी पराभूत करत खिताब जिंकला आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारताची कामगिरी अप्रतिम होती आणि अंतिम सामन्यातही या संघाने आपला जोम कायम ठेवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना युसुफ पठाण आणि युवराज सिंहच्या अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 4 गडी बाद 181 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका लेजेन्ड्सला 158 धावापर्यंत मजल मारता आली आहे.
भारताकडून वीरेंद्र सेहवागने 10 धावा केल्या आहे. तर, कर्णधार आणि संघाचा सलामीवीर सचिन तेंडुलकरने 23 चेंडूत 30 धावा केल्या. एस. बद्रीनाथ 7 करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या युवराज सिंह आणि युसूफ पठाणने संघाचा डाव सावरला. या सामन्यात युवराज सिंहने 60 आणि युसूफ पठाणने नाबाद 62 धावांची खेळी केली. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंडिया लेजेन्ड्सने 20 षटकात 181 धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेकडून रंगना हेरथ, सनथ जयसूर्या, महारुफ आणि के वीररत्ने यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाला. हे देखील वाचा- Asghar Afghan Breaks MS Dhoni Record: महेंद्र सिंह धोनीचा 'हा' विक्रम अखेर मोडला; अफगाणिस्तान संघाचा कर्णधार असगर अफगान याची मोठी कामगिरी
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली. सनथ जयसूर्या आणि कर्णधार तिलकरत्ने दिलशान यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र, दिलशान 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर चारा सिल्व्हाही अवघ्या 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात जयसूर्याने 25 चेंडूत 43 धावा केल्या. परंतु, युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर जयसूर्याही बाद झाला.
त्यानंतर मैदानात आलेल्या कौशल्य वीरातने आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्याने 15 चेंडूत 38 धावा केल्या. परंतु, मनप्रीत गोनीने त्याला माघारी धाडले. उपुल थरंगाने संघासाठी 13 धावांचे योगदान दिले. जयसिंगा 39 धावा तर, नुवान कुलशेखरा एक धाव करून नाबाद राहिले. भारताकडून युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर, मनप्रीत गोनी यांनी एक गडी बाद केला.