वेस्टइंडीज संघाने पुण्यात खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला ४३ धावांनी नमवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कसोटी मालिकेत भारताने धुव्वा उडवल्यानंतर एकदिवसीय मालिकेत वेस्टइंडीजचा संघ एका वेगळ्याच जिद्दीने खेळताना दिसत आहे. आता पर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार कामगिरी केली जात आहे. मालिकेतला चौथा एकदिवसीय सामना आज मुंबई येथे ब्रेबॉर्न स्टेडियम वर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना मालिकेत वर्चस्व गाजवण्याची नामी संधी आहे. नक्की वाचा: विराटने गाठला 10000 धावांचा टप्पा ; मोडला सचिनचा विक्रम.
कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात सुद्धा आपल्या ‘विराट’ खेळीचे प्रदर्शन करत शतक ठोकले. त्याचे या मालिकेतले हे सलग तिसरे शतक होते. परंतु, विराट आणि रोहित शर्मा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आहे. भारताची मधली फळी ही डोकेदुखी ठरली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाण्यापूर्वी भारताला या समस्येवर तोडगा काढायला हवा. संघात अष्टपैलू केदार जाधवचा संघात समावेश केला जाऊ शकतो. त्याचं संघातलं महत्व खूप आहे याची कबुली कोहलीने पुण्यात झालेल्या पराभवानंतर दिलीच आहे.
धोनीचं भविष्य काय?
T20 मालिकेसाठी डच्चू मिळाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या एकदिवसीय संघातील स्थानावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामनात उत्कृष्ट यष्टीरक्षण करणारा धोनी धावांसाठी झगडत आहे. त्याची कामगिरी सुधारली नाही तर त्याला एकदिवसीय संघातून सुद्धा वगळण्यात येऊ शकतं. भारताला विश्वचषक विजेता कर्णधार अशी ओळख असणाऱ्या धोनीची अशी अवस्था पाहून क्रिकेट चाहते निराश झाले आहेत यात शंकाच नाही. नक्की वाचा: धोनीची अफलातून कॅच ; निवड समितीला चोख उत्तर (Video).
कधी आणि कुठे आहे सामना?
भारत वि वेस्टइंडीज चौथा एकदिवसीय सामना २९ ऑक्टोबरला ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव.
वेस्ट इंडिज संघ: जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियान अॅलीन, सुनील अॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, अॅश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस, ओबॅड मॅकॉय, किरॉन पॉवेल.