IND vs SA Series 2022: भारतीय ताफ्यात 2 नव्या स्टार्ससी एन्ट्री, IPL मध्ये शानदार कामगिरीचे मिळाले फळ; दिग्गजांचेही पुनरागमन
उमरान मलिक (Photo Credit: PTI)

India Squad for SA Series: बीसीसीआयने दक्षिण आफ्रिके (South Africa Series) विरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांसारख्या मोठ्या नावांना विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुलकडे संघाचे कर्णधारपद तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच संघात काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली असून काही दिग्गज खेळाडूंचेही पुनरागमन झाले आहे. आयपीएलचा (IPL) 15वा सीझन 29 मे रोजी संपेल, त्यानंतर 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिला टी-20 सामना दिल्लीत, त्यानंतर अनुक्रमे कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर उर्वरित सामने खेळले जातील. (Team India: इंग्लंड दौरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; KL Rahul कडे टीमची कमान, Shikhar Dhawan कडे दुर्लक्ष)

युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांची प्रथमच भारतीय संघात (Indian Team) निवड झाली आहे. उमरान मलिक मूळचा जम्मू आणि काश्मीरचा असून, त्याने आयपीएल 2022 च्या चालू हंगामात आपल्या वेगानं खूप प्रभावित केलं. हे पाहता आगामी मालिकेत त्याला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. उमरानने या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले असून एकूण 21 विकेट घेतल्या आहेत. गेल्या मोसमात त्याने 3 सामन्यात 2 बळी घेतले होते. त्याच्याकडे 145-150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. मलिकने सनरायझर्स हैदराबादसह त्याच्या पहिल्या पूर्ण आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. धोकादायक वेगाने फलंदाजांना अडचणीत आणण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याने इतर वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत अधिक प्रभाव पाडला आहे.

तसेच पंजाब किंग्जकडून डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहचीही पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. तो 2019 पासून आयपीएलमध्ये खेळत असून चालू हंगामात त्याने 13 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.8 आहे. या लीगमध्ये त्याने एकूण 40 विकेट घेतल्या आहेत. उमरान आणि अर्शदीप यांच्याशिवाय आवेश खान, रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल या प्रतिभावान खेळाडूंचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपापल्या संघांसाठी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनेही तीन वर्षांच्या कालावधीनंतर टी-20 संघात पुनरागमन केले. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी 36 वर्षीय खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 14 डावात 191.33 च्या स्ट्राईक रेटने 287 धावा केल्या.