IND vs SA Series 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 संपल्यानंतर आता भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात टी-20 मालिका होणार आहे. तब्बल दोन महिन्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार असून ही मालिका 9 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेत अनेक मोठे विक्रम बनण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका पाच वेगवेगळ्या ठिकाणी खेळली जाणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पहिला सामना खेळला जाणार असून मालिकेची सांगता बेंगलोर येथे होईल. दरम्यान या मालिकेत बनणारे विक्रम खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SA Series 2022: ‘आम्ही लहानपणापासून खूप वेगाने खेळत आहोत...’, T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका कर्णधाराचे उमरान मलिकवर मोठे विधान)
सलग सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा देश
टी-20 विश्वचषक 2021 मध्ये आपले शेवटचे तीन सामने सातत्याने जिंकणाऱ्या भारतीय संघाने मागील 12 सामने सलग सलग खिशात घातले आहेत. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाला (Team India) इतिहास घडवण्याची संधी आहे. जर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना जिंकला तर ते सलग सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा पहिला संघ ठरेल. सध्या अफगाणिस्तान आणि रोमानिया यांनीही सलग 12 सामने जिंकले आहेत आणि भारताने श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना जिंकून बरोबरी केली आहे.
सर्वात जलद 2,000 धावा
केएल राहुलने (KL Rahul) आतापर्यंत खेळलेल्या 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 52 डावांमध्ये 1,831 धावा केल्या आहेत. या मालिकेत तो 2 हजार धावाही पूर्ण करू शकतो. राहुलने पुढील तीन डावात 169 धावा केल्या तर तो सर्वात जलद 2,000 आंतरराष्ट्रीय टी-20 धावा करणारा भारतीय ठरेल. यासह तो जगातील सर्वात जलद 2,000 धावा करणारा दुसरा फलंदाज बनेल.
डी कॉक 2,000 टी-20 धावा करणारा पहिला दक्षिण आफ्रिकी फलंदाज
आयपीएलमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 2,000 धावा करणारा पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बनण्याची संधी आहे. डी कॉकला हा पराक्रम करण्यासाठी 173 धावांची गरज आहे. मात्र, 108 धावा करून तो दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या, जेपी ड्युमिनी 1,934 धावांसह दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक टी-20 धावा करणारा खेळाडू आहे.
श्रेयस अय्यर बनेल एक हजारी मानसबदार
श्रेयस अय्यरने आतापर्यंत खेळलेल्या 36 टी-20 सामन्यांच्या 32 डावांमध्ये 36.77 च्या सरासरीने 809 धावा केल्या आहेत. अय्यरने या काळात सहा अर्धशतके झळकावली आहेत. या मालिकेत त्याच्याकडे 1000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. जर त्याने या मालिकेत 191 धावा केल्या तर तो 1,000 आंतरराष्ट्रीय टी-20 धावा करणारा तिसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनेल. विराट कोहलीने 27 डावात भारतासाठी सर्वात जलद 1000 धावा केल्या आहेत.