IND vs SA 3rd Test 2022: केपटाऊनमध्ये टीम इंडियाच्या पदरी पराभवाची निराशाच, विराट ब्रिगेडला नडल्या ‘या’ चुका
टीम इंडिया (Photo Credit: Twitte/ICC)

IND vs SA 3rd Test 2022: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात नुकत्याच संपुष्टात आलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या टीम इंडियाला (Team India) सात विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कीगन पीटरसनच्या (Keegan Pietersen) शानदार अर्धशतकी खेळीने Proteas देशात भारताच्या पहिल्या कसोटी विजयाच्या आशेवर पाणी फेरले. इतकंच नाही तर केपटाऊन येथे पहिला कसोटी सामना जिंकण्याची संधी देखील ‘विराटसेने’ने गमावली आणि या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने आपला विजयीरथ सुरूच ठेवला आहे. यासामन्यात खेळाडूंनी केलेल्या चुका भारतीय संघाच्या पराभवाच्या रूपात चांगल्याच महागात पडल्या. (IND vs SA 3rd Test Day 4: केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका अजेय! ‘विराटसेना’ 7 विकेटने पराभूत, टीम इंडियाच्या पहिल्या कसोटी विजयाचे स्वप्न भंगले)

1. खेळाडूंची निवड

भारतीय कसोटी संघातील अणे खेळाडूंच्या विशेषतः, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या, फॉर्मवर अनेक काळापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दोघे आतापर्यंत मोठी खेळी करून संघात योगदान देण्यात अपयशी ठरले आहे. याशिवाय केपटाऊन कसोटीच्या दोन्ही डावात संघ अडचणीत असताना दोघांनी निराशा केली. पुजाराने अनुक्रमाने 44 आणि 9 तर रहाणेने पहिल्या डावात 9 तर दुसऱ्या भोपळा न फोडता माघारी परतला होता. या दोन ज्येष्ठ खेळाडूंच्या बॅटनी अपयशामुळे संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकला नाही. पुजारा आणि रहाणेला संघाबाहेर करून हनुमा विहारी व श्रेयस अय्यरला संधी देण्याची मागणी केली जात होती. पण संघ व्यवस्थापनाने या अनुभवी जोडीवर विश्वास दर्शवला ज्याची ते परतफेड करू शकले नाही.

2. सलामी जोडीचे अपयश

केएल राहुल आणि मयंक अग्रवालच्या सलामी जोडी सलग दुसऱ्या सामन्यात संघाला आश्वासक सुरूवात करून देण्यात फ्लॉप ठरली. दोघे सलामीसाठी दोन्ही डावात अर्धशतकी भागीदारीही करू शकले नाही. परिणामी अन्य खेळाडूंवर धावांसाठी दबाव वाढला.

3. गोलंदाजांचा फ्लॉप-शो

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला 210 धावांत गुंडाळलेले भारतीय धुरंधर गोलंदाजांना दुसऱ्या डावात विकेटसाठी यजमान फलंदाजांनी भरपूर संघर्ष करायला लावला. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताचे गोलंदाज दुसऱ्या डावात नियमित अंतराने विकेट घेऊ शकले नाही ज्यामुळे विरोधी संघाला भागीदारी करण्याची संधी मिळाली ज्यामुळे छोट्या लक्ष्याचा बचाव करताना खेळाडूंवरील दबाव वाढला जो नियमित वेळी त्यांच्या वागण्यावरून दिसून आला.