IND vs SA 1st Test Day 5: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामना जिंकून इतिहास घडवला आहे. सुपरस्पोर्ट पार्क येथे विजयासाठी मिळालेल्या 305 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) 191 धावांवरच गारद झाली आणि भारताने 113 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. उल्लेखनीय म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन (Centurion) येथे भारतीय संघाचा (Indian Team) हा प्रथम विजय ठरला असून यापूर्वी या मैदानावर झालेल्या दोनही सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. या विजयासह तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ‘विराटसेने’ने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यजमान संघाने पाचव्या दिवशी 94/4 धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली पण भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक खेळीपुढे जास्त वेळ टिकून खेळू शकली नाही. (Virat Kohli वारंवार ऑफ-स्टंपच्या बाहेरील चेंडूवर होतोय आऊट, पण प्रशिक्षक Vikram Rathour म्हणतात तो शॉट खेळून सोडू नको)
सामन्याच्या निर्णायक दिवशी कर्णधार डीन एल्गर आणि टेंबा बावुमा यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव खेळण्यास पुढे सुरुवात केली. एल्गारने अर्धशतकी खेळी करून संघाचे पुढाकाराने नेतृत्व केले. जसप्रीत बुमराहने पाचव्या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले आणि एल्गरला 77 धावांवर बाद केले. त्यानंतर बावुमा आणि क्विंटन डी कॉकने धावफलक हालत ठेवला. पण सिराजने डी कॉकचा 21 धावांवर त्रिफळा उडवून भारताला विजयाच्या नजीक नेले. यानंतर शमीने विआन मुल्डरला स्वस्तात माघारी धाडलं तर मार्को जॅन्सनला दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अश्विनने कगिसो रबाडा आणि एनगिडीला भोपळाही फोडू आला नाही. यादरम्यान बावुमा अखेरपर्यंत तळ ठोकून खेळत राहिला असला तरी त्याला दुसऱ्या बाजूने योग्य साथ न मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेला सलामीच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहायला लागले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर सिराज आणि आर अश्विनने प्रत्येकी 2 गडी बाद करून भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, दोन्ही संघांच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुलचे शतक आणि मयंक अग्रवालच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 327 धावांपर्यंत मजल मारली. तर दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 6 आणि कगिसो रबाडाने 3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिला डाव अवघ्या 197 धावांवर संपुष्टात आला आणि भारताला 130 धावांची मोठी आघाडी मिळाली. अर्धशतकवीर बावुमाला वगळता एकाही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि शार्दुल ठाकूर व जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तथापि यजमान गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करून भारताचा दुसरा डाव 174 धावता गुंडाळला. अशाप्रकारे यजमान संघाला 305 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले.