न्यूझीलंडविरुद्ध ऑकलँडच्या (Auckland) इडन पार्कमधील 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने (India) गोलंदाजीनंतर फलंदाजीने दमदार खेळ करत 7 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाला विजयासाठी 133 धावांचे लक्ष्य दिले होते. यजमान किवी संघाविरुद्ध या सामन्यात पुन्हा एकदा भारताची मजबूत फलंदाजी पाहायला मिळाली. सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) 57 आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 44 धावा केल्या, तर किवींकडून टिम साऊथी (Tim Southee) याने 2 गडी बाद केले. ईश सोढीने 1 गडी बाद केला. शिवम दुबेने 4 चेंडूंत नाबाद 8 धावा केल्या. श्रेयसने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका बजावली. ऑकलंडमधील याच मैदानावर पहिल्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी करत सामना 6 गडी राखून जिंकला होता. या मालिकेचा तिसरा टी-20 सामना बुधवारी 29 जानेवारी रोजी हॅमिल्टनमध्ये खेळला जाईल. (Video: ऑकलंड टी-20 सामन्यात शार्दुल ठाकूर आणि कॉलिन मुनरो यांची खेळपट्टीवर झाली टक्कर, किवी फलंदाजाच्या Rugby कौशल्याचे Twitter वर कौतुक)
या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल आणि टिम सेफर्ट यांनी प्रत्येकी 33-33 धावा केल्या, तर कॉलिन मुनरो 26 आणि रॉस टेलर 18 धावा करून बाद झाले. भारताकडून रवींद्र जडेजाने 2 गडी बाद केले, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. न्यूझीलंडने दिलेल्या 133 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने फक्त 2 विकेट्स गमावल्या. भारताने 17.3 षटकांत तीन विकेट्स गमावून 135 धावा केल्या. भारतीय संघाने प्रभावी गोलंदाजी केली आणि न्यूझीलंडला चांगली सुरुवात करण्याचा फायदा घेऊ दिला नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुलच्या जोडीकडून टीम इंडियाला चांगली सुरुवात अपेक्षित होती, परंतु रोहितने निराश केले. रोहितने 8 धावा केल्या आणि टेलरच्या हाती साऊथीने झेलबाद केले. साऊथीच्या तिसर्या षटकात कर्णधार विराट कोहलीही 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर लक्ष्याच्या जवळ येऊन श्रेयसने 44 धावांवर आपली विकेट गमावली. ईश सोढी च्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस साऊथीकडे कॅच आऊट झाला.