न्यूझीलंड (New Zealand) विरोधात आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (Indian team0 जाहीर झाला आहे. विराट कोहलीच्या टी-20 मधून कर्णधार म्हणून निवृत्तीनंतर रोहित शर्माची (Rohit Sharma) नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 16 सदस्यीय भारतीय संघात पहिल्यांदाच आयपीएल (IPL) 2021 गाजवणाऱ्या युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज हर्षल पटेल तर आयपीएल 2021 च्या यूएई लेगमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वोत्तम फलंदाज ठरलेल्या व्यंकटेश अय्यरलाही (Venkatesh Iyer) या संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा रुतुराज गायकवाडही (Ruturaj Gaikwad) रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघात आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. किवी संघाचा भारत दौऱ्याने अनेक खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावरही असेच चित्र पाहायला मिळाले होते पण त्यावेळी खेळाडू आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले होते. (IND vs NZ 2021 Series: रोहित शर्माची कर्णधारपदी निवड, KL Rahul उपकर्णधार; विराट कोहली समवेत चार स्टार खेळाडूंना विश्रांती)
टीम इंडिया 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) आपली धमाल करताना दिसणार आहे. पटेलने यंदाच्या आयपील हंगामात 15 सामन्यात एकूण 32 विकेट घेत चमकदार कामगिरी केली होती. आयपीएलच्या या मोसमातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय निवड समितीने पटेलकडे दुर्लक्ष न करून त्याला संघात स्थान दिले. दुसरीकडे, व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2021 च्या यूएई लेगमध्ये केकेआरसाठी चांगली फलंदाजी केली आणि त्याचे त्याला उपयुक्त फळही मिळाले. यंदाच्या मोसमात व्यंकटेशने 10 सामन्यात 370 धावा केल्या होत्या, तर या मोसमात सर्वाधिक धावा करणारा रुतुराज गायकवाडही संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
गायकवाडची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती, मात्र त्याला मिळालेल्या संधींमध्ये तो फारसा चांगला खेळ करू शकला नाही. नंतर आयपीएलमध्येही त्याने आपला रंग दाखवला आणि या मोसमात सर्वाधिक धावा करण्याबरोबरच शतकही केले. रुतुराजने चेन्नई सुपर किंग्सना चौथे विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आणि 16 सामन्यात 635 धावा केल्या. या मोसमातील त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 101 होती. याशिवाय दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या आवेश खानची देखील संघात एन्ट्री झाली आहे.