IND vs NAM, ICC T20 World Cup 2021: ‘विराट यूग’ अलविदा! अंतिम विश्वचषक सामन्यात नामिबीयाचा पराभव करून टीम इंडियाची प्रशिक्षक रवि शास्त्री यांना विजयी भेट
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) आपल्या अखेरच्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) नामिबियावर (Namibia) 9 विकेटने मात करून सलग तिसरा विजय मिळवला. आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या जबरदस्त फिरकी गोलंदाजीपुढे नामिबिया 8 बाद 132 धावाच करू शकली. प्रत्युत्तरात भारताने 1 विकेट गमावून षटकात लक्ष्य गाठले. भारताच्या विजयात रोहित शर्माने (Rohit Sharma) 37 चेंडूत 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुल (KL Rahul) 54 धावा आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 25 धावा करून नाबाद राहिले. यासोबतच विराट कोहलीचा टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून प्रवास संपुष्टात आला आहे. विराटने स्पर्धेपूर्वी टी-20 संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. शिवाय मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi  Shastri) यांचाही संघासोबतचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. अशा परिस्थितीत संघाने शास्त्री यांना विजयी भेट देऊन निरोप दिला. (Ravi Shastri यांचा ‘महान संघांपैकी एक’ टीम इंडियाला निरोप, विदाई सामन्यापूर्वी पहा काय म्हणाले)

नामिबियाला पराभूत करून भारताने टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजयासह आपली मोहीम संपुष्टात आणली आहे. भारताचा स्पर्धेसाठी गट 2 मध्ये समावेश करण्यात आला असून त्यापैकी पाकिस्तान आणि न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या यंदाच्या प्रवासाबद्दल बोलायचे तर संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तान विरोधात 10 विकेटने झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया स्वतःला न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात देखील सावरू शकली नाही. किवी संघाने स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय संघावर सर्व विभागात वर्चस्व गाजवले आणि 8 विकेटने दणकेबाज विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा संघाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि ते पिछाडीवर पडले. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड विरुद्ध संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला पण अफगाणवर किवी संघाच्या विजयाने ‘विराटसेने’च्या आशेवर पाणी फेरले.

दरम्यान भारताविरुद्ध दुबई येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नामिबियासाठी डेविड विसेने सर्वाधिक 26 धावा आणि सलामीवीर स्टीफन बार्डने 21 धावा केल्या. तसेच भारताकडून अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. दुसरीकडे, वर्ल्ड कप स्पर्धेत आता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघात सेमीफायनलचा घमासान रंगणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला जाईल तर 11 नोव्हेंर रोजी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये दुसरा उपांत्य फेरी सामना रंगेल. अखेरीस 15 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल.