IND vs ENG 1st Test: भारताविरुद्ध माईंड गेम खेळण्यास सुरुवात, खेळपट्टीबाबत दिग्गज इंग्लंड गोलंदाजाने केले ‘हे’ मोठे भाष्य
इंग्लंडचा जेम्स अँडरसन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे. कसोटी मालिका सुरू होण्याआधी, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) खेळपट्टीबाबत माईंड गेम खेळत कसोटी मालिकेदरम्यान खेळपट्टीवर अतिरिक्त गवत दिसू शकतो असा इशारा दिला. अँडरसन म्हणाला की, जसे यंदा वर्षाच्या सुरुवातीला भारताने त्यांच्या घरच्या मैदानावर अनुकूल खेळपट्ट्या बनवल्या होत्या त्याप्रमाणे इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चांगल्या खेळपट्ट्या तयार केल्या पाहिजेत. मालिकेचा पहिला सामना नॉटिंगहम (Nottingham) येथे बुधवारपासून सुरुवात होत आहे. “जर आम्ही खेळपट्टीवर काही गवत सोडले तर मला वाटत नाही की भारत तक्रार करू शकतो, कारण भारताच्या शेवटच्या दौऱ्यात आम्ही निश्चितपणे त्यांच्या मैत्रीपूर्ण परिस्थितीत खेळलो,” अँडरसन म्हणाला. (IND vs ENG 2021: भारत-इंग्लंड मालिकेत ‘हा’ संघ होणार विजयी, Michael Vaughan यांनी वर्तवला मालिकेच्या निकालाचा अंदाज)

“त्याने घरच्या परिस्थितीचा आपल्या फायद्यासाठी वापर केला आणि माझा विश्वास आहे की जगभरातील अनेक संघ तसे करतात,” तो म्हणाला. कसोटी क्रिकेटमध्ये 617 विकेट घेणारा अँडरसन म्हणाला, “जर खेळपट्टीवर काही गवत असेल तर भारताकडे वेगवान गोलंदाजी आक्रमण देखील आहे. मी काही चांगल्या खेळपट्ट्यांची वाट पाहत आहे. आम्हाला खेळपट्ट्यांचा वेग वाढवायचा आहे. वेगवान गोलंदाज म्हणून आम्हाला वेग आणि उसळी हवी आहे कारण आम्हाला माहित आहे की चेंडू स्विंग होईल आणि चेंडू बॅटची धार घेण्याची शक्यता वाढते.” 2003 मध्ये पदार्पण केल्यापासून 162 कसोटी खेळणारा अँडरसनने आयपीएल पिढीतील फलंदाजांनी निष्काळजीपणे फलंदाजी केल्याचे मान्य केले आणि या संदर्भात रिषभ पंतचे उदाहरण दिले.

“वेगवेगळ्या पिढ्यांच्या फलंदाजांविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळणे हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आयपीएल पिढीतील फलंदाजांमधील फरक तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. ते निश्चिंत खेळतात आणि कोणत्याही स्वरूपात फटके मारण्यास घाबरत नाही. रिषभ पंतकडे पाहा तो गेल्या दौऱ्यात माझ्याविरुद्ध नवीन चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळत होता. तुम्ही सौरव गांगुलीला असे करताना कधीच पाहिले नाही.”