इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: ANI)

IND vs ENG Series 2021: भारतविरुद्ध (India) 5 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी इंग्लंड (England) संघ श्रीलंकेहून चेन्नई (Chennai) येथे दाखल झाला. श्रीलंकेचा 2-0 असा क्लीन स्वीप करणारा जो रूटचा इंग्लंड संघ कोविड-19 (COVID-19) प्रोटोकॉलनुसार आता 6 दिवस क्वारंटाइन राहणार आहे. इंग्लंड क्रिकेटने (England Cricket) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, खेळाडू टीम बसमधून बाहेर पडताना आणि हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अनिवार्य सुरक्षा तपासणीतून जाताना पाहिले जाऊ शकतात. व्हिडिओमध्ये हॉटेलचे कर्मचारी आणि जो रूट चेहऱ्यावर हसू ठेवून एकमेकांना अभिवादन करताना दिसून येत आहेत. स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यापूर्वीच चेन्नईमध्ये पोहचला आहे आणि क्वारंटाइन प्रक्रियेतून जात आहे. 29 वर्षीय स्टोक्सला श्रीलंका दौर्‍यामधून विश्रांती देण्यात आली होती. मंगळवारी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर मंगळवारी चेन्नईत दाखल झाल्याची ही माहिती मिळाली आहे. (IND vs ENG Series 2021: रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर चेन्नईला दाखल, इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी इतके दिवस करू शकणार ट्रेनिंग)

.

दरम्यान, एअरपोर्टवर पोहचताच इंग्लंड संघातील सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली. ANIने संघाचे एअरपोर्टवरील फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले. उर्वरित कसोटी आणि टी-20 फिक्स्चरसाठी अहमदाबादला रवाना होण्यापूर्वी दोन्ही संघ चेन्नईत पहिले दोन कसोटी सामने खेळतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 आणि श्रीलंकेविरुद्ध 2-0 क्लीन स्वीप केल्यानंतर भारत व इंग्लंड संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरतील. पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारी तर दुसरा सामना 13 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. चेन्नईने अखेर इंग्लंडविरुद्ध डिसेंबर 2016 मध्ये एक कसोटी सामना आयोजित केला होता. PTI ला दिलेल्या माहितीनुसार दोन्ही संघ 2 फेब्रुवारी रोजी सरावाला सुरुवात करतील. "दोन्ही संघातील सदस्यांना सामनाधिकारी यांच्यासह हॉटेल लीला पॅलेसमध्ये ठेवले जाईल. ते सहा दिवस वेगळे राहतील आणि 2 फेब्रुवारीपासून सराव सुरू होण्याची शक्यता आहे," अधिकाऱ्याने सांगितले.

इंग्लंड क्रिकेट

दुसरीकडे, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत तसेच जसप्रीत बुमराहसह काही खेळाडू बुधवारी सकाळी चेन्नईला पोहचले आहेत. शिवाय, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य भारतीय खेळाडूदेखील चेन्नईला येण्यासाठी रवाना झाले असून टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीही बुधवारी उशिरापर्यंत चेन्नईला पोहचेल.