IND Vs ENG ODI Series: इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात Virat Kohli मोडू शकतो 'हे' 5 मोठे रेकॉर्ड
विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या संघाला कसोटी आणि टी-20 मालिकेत धुळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता एकदिवसीय मालिकेवरही तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, टी-20 मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) तडाखेबाज फलंदाजी केली होती. मात्र, आता विराटला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिकेत 5 मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. विराट कोहली हा भारतीय माजी खेळाडू युवराज सिंह, सुरेश रैना, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचे रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यात खेळविण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे हे सर्व सामने प्रेक्षकांविना खेळले जाणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 23 मार्चला होणार आहे. तर, दुसरा सामना 26 मार्च आणि तिसरा सामना 28 मार्चला पार पडणार आहे. हे तिन्ही एकदिवसीय सामन्यांची सुरुवात दुपारी दीड वाजता सुरु होतील. हे देखील वाचा- Road Safety World Series Final: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात India Legends विजयी; Sri Lanka Legends 14 धावांनी पराभूत

सुरेश रैनाचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता-

विराट कोहलीकडे भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. सुरेश रैना इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध 30 सामने खेळून 1 हजार 178 धावा केल्या आहेत. विराटला सुरेश रैनाचे रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ 39 धावांची गरज आहे.

युवराज सिंहच्या विक्रमाशी बरोबरी -

इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात विराट एक शतक ठोकतो तर, तो युवराज सिंहच्या विक्रमाशी बरोबरी करेल. युवराजने इंग्लंड विरुद्ध 4 एकदिवसीय शतक केले आहेत.

रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. रिकी पॉन्टिंगने कर्णधार पदावर असताना 41 शतक ठोकले आहेत. रिकी पॉन्टिंगच्या या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी विराट कोहली केवळ एक शतक दूर आहे.

घरच्या मैदानात 5 हजार धावांचा टप्पा-

घरच्या मैदानावर विराट कोहली त्याच्या 5000 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावांपासून अवघ्या 135 धावा दूर आहे. विराट एकदिवसीय सामन्यात आणखी 135 धावा करू शकला तर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडनंतर तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडण्याची शक्यता-

सचिनने घरच्या मैदानावर एकूण 20 शतके केली आहेत. सध्या विराट कोहलीने घरच्या मैदानावर 19 शतके ठोकली आहे. जर इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिके विराट आणखी 2 शतक करतो. तर, तो सचिनचा अनोखा विक्रम मोडेल आणि एक नवा इतिहास रचेल.