IND vs ENG, ICC World Cup 2019: युजवेंद्र चहल ने मोडला 16 वर्षांपूर्वीचा नकोसा रेकॉर्ड, इंग्लंड विरुद्ध दिल्या इतक्या धावा
(Photo Credits: Getty Images)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) सामना चांगलाच रंगतोय. टॉस जिंकत यजमान इंग्लंडने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो ने 160 धावांची भागीदारी करत टीमला भन्नाट सुरुवात करून दिली. एकीकडे गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकला तर दुरीकडे फिरकी गोलंदाजांना मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी टार्गेट केले. (IND vs ENG, ICC World Cup 2019: मोहम्मद शमी ने केला विश्वकपमध्ये 5 विकेट घेण्याचा पराक्रम, शाहिद आफ्रिदी च्या विक्रमाची केली बरोबरी)

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने चांगली गोलंदाजी केली असली तरी, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ला मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी सोडले नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी चहलची चांगली धुलाई केली. चहलनं आपल्या 10 ओव्हरमध्ये 8.08च्या सरासरीनं 88 धावा दिल्या. शिवाय त्याला एकही विकेट मिळाली नाही. इंग्लंडविरुद्ध या सामन्यात आपल्या या खेळीने चहलने विश्वकपच्या इतिहासातील नकोसा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारताकडून सर्वात जास्त धावा देण्याच्या यादीत चहल आता अव्वल क्रमांकावर पोहचला आहे.

चहलच्याआधी माजी फलंदाज जवागल श्रीनाथ (Javagal Srinath)यांच्या नावावर हा विक्रम होता. 2003 च्या विश्वकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात श्रीनाथ यांनी 87 धावा दिल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा देण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत करसन घावरी (Karsan Ghavri). घावरी यांनी 1975 च्या विश्वकपमध्ये लॉर्डस (Lords) च्या मैदानावर 83 धावा दिल्या होत्या.

आजच्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेत भारताला 338 धावांचे आव्हान दिले. शमीने पुन्हा एकदा आपल्या खेळीने चाहत्यांची मन जिंकले. शमीने 69 धावा देत 5 विकेट घेतल्या. यंदाच्या विश्वकपमध्ये शमीने पहिल्यांदा 5 विकेट घेण्याची कमाल केली आहे. दरम्यान, बेन स्टोक (Ben Stokes) च्या 79 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 337 धावांपर्यंत मजल मारली.