IND vs ENG 5th T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा स्टेडियमवर आज भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेचा अंतिम व निर्णायक सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात इंग्लिश संघाचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही उभय संघातील द्विपक्षीय मालिका सध्या 2-2 अशा बरोबरीत असून आजच्या सामन्यातील विजयी संघ मालिका काबीज करेल. अशास्थितीत, आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे तर इंग्लिश संघ त्याच संयोजनासह मैदानात उतरेल. केएल राहुलच्या जागी संघाने टी नटराजनचा समावेश केला आहे. अशास्थितीत, पहिले फलंदाजी करणाऱ्या यजमान संघासाठी रोहित शर्मा- कर्णधार विराट कोहलीची जोडी सलामीला येईल तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर उतरेल. शिवाय, मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या धावगती वाढवतील. मात्र, संघाने गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत करत नटराजनचा समावेश केला ज्याचा टीमला नक्कीच फायदा होताना दिसत आहे. (IND vs ENG 5th T20I 2021: भारत-इंग्लंड पाचवा टी-20 सामना ठरणार खास; रोहित, राहुलसह खेळाडू करू शकतात ‘हे’ मोठे रेकॉर्ड)
दुसरीकडे, मॉर्गनच्या इंग्लिश टीमने मागील सामन्यातून कोणताही बदल केला नाही. जेसन रॉय आणि जोस बटलर डावाची सुरुवात करतील. तथापि नंबर एक टी-20 फलंदाज डेविड मलानचा फॉर्म सध्या संघासाठी काळजीचा विषय बनला आहे. जॉनी बेअरस्टो, कर्णधार इयन मॉर्गन आणि बेन स्टोक्स मधल्या फळीची जवाबदारी सांभाळतील. यानंतर, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, क्रिस जॉर्डन, आदिल रशीद आणि मार्क वुड आपल्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना त्रास देण्याच्या प्रयत्नात असतील. शिवाय, जॉर्डन आणि सॅम कुरन बॅटने देखील संघात योगदान देऊ शकतात. विशेष म्हणजे टीम इंडियाने यापूर्वी गमावलेल्या दोन सामन्यात वूडने आपल्या आक्रमणाने यजमान फलंदाजांना चांगलंच गोत्यात आणलं होतं त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात त्याच्यापासून संघाला धोका होऊ शकतो.
असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, राहुल चाहर आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड: इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर (विकेटकीपर), डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम कुरन, आदिल रशीद, मार्क वूड, क्रिस जॉर्डन आणि जोफ्रा आर्चर.