भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd ODI 2021:  रविवार, 28 मार्च रोजी भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात वनडे मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना रंगणार आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लिश संघाने 6 विकेटने यजमान संघाला पराभवाचा धक्का दिला आणि मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे, आता तिसऱ्या सामन्यात मालिका विजयाचा निर्णय होईल. दोन्ही संघ विजयासाठी कोणतीही कसर सोडणार नाही अशास्थितीत सामना रंगतदार होईल असे दिसत आहे. दोन्ही संघातील फलंदाज सध्या आक्रमक फॉर्ममध्ये असून तिसऱ्या सामन्यात विजयासाठी सर्वतोपरीने प्रयत्नशील असतील. मात्र मालिका धोक्यात असताना भारतीय संघ (Indian Team) तिसऱ्या ‘करो या मरो’च्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करू शकते. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) टार्गेट करत सर्वाधिक धावा लुटल्या. शिवाय, गोलंदाज एकही विकेट काढू शकला नाही. (IND vs ENG 2nd ODI 2021: निर्णायक सामन्यात बेअरस्टो-स्टोक्सचा भारताला दणका, दुसऱ्या वनडेत 6 विकेट विजयाने इंग्लंडची मालिकेत 1-1 बरोबरी)

कुलदीप यादव दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियासाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोच्या जोडीला कुलदीपच्या गोलंदाजीवर सर्वाधिक धावा लुटल्या. यादवने आपल्या 10 ओव्हरमध्ये 8.40 इकॉनॉमी रेटने 84 धावा दिल्या. शिवाय, पहिल्या वनडे सामन्यात देखील कुलदीप विकेट घेण्यात अपयशी ठरला होता. पुणे येथे झालेल्या मालिकेच्या सलामीच्या सामन्यात कुलदीपने 68 धावा लुटवल्या होत्या. अशास्थितीत, मालिकेत विजय  धोक्यात असताना विराट आणि संघ व्यवस्थान कुलदीपच्या जागी युजवेंद्र चहलचा समावेश करू शकतात. याव्यतिरिक्त अन्य विभागात बदल होताना दिसत नाही. रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडीच सलामीला उतरेल तर केएल राहुल चौथ्या स्थानावर फलंदाजीला येईल. कृणाल पांड्याची देखील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने धुलाई केली असली तरी बॅटने त्याची क्षमता पाहता त्याच्या स्थानाला कोणताही धोका संभवत नाही. प्रसिद्ध कृष्णाने आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात स्वतःची योग्यता सिद्ध केली, त्यामुळे त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान कायम राहिलं.

पहा तिसऱ्या वनडेसाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.