IND vs ENG 3rd ODI 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर 7 धावांनी जोरदार विजय मिळवला व तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. विशेष म्हणजे या द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघाने इंग्लिश संघाचा सफाया केला आणि निर्विवाद वर्चस्व गाजवले. यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत 3-1 आणि टी-20 मालिकेत 3-2 असा विजय मिळवला होता. टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत 330 धावांच इंग्लंडला विशाल लक्ष्य दिलं होतं ज्याच्या प्रत्युत्तरात 50 ओव्हरमध्ये संघाने 322 धावांपर्यंतच मजल मारली. इंग्लिश टीमसाठी डेविड मलाने (Dawid Malan) 50 धावा केल्या तर लियाम लिविंगस्टोनने 36 आणि बेन स्टोक्सने 35 धावांचे योगदान दिले. सॅम कुरन (Sam Curran) 95 धावा आणि रीस टोपली 1 धाव करून नाबाद परतले. भारताकडून शार्दूल ठाकूरला 4 तर भुवनेश्वर कुमारला 3 विकेट मिळाल्या आणि टी नटराजनने 1 गडी बाद केले. (IND vs ENG 3rd ODI 2021: शिखर धवनने अचूक पकडला Ben Stokes चा कॅच आणि Hardik Pandya याचा जीव भांड्यात पडला Watch Video)
यापूर्वी, टॉस गमावून फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित शर्मा-शिखर धवनने शहकी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रोहित-धवनमध्ये 103 धावांची भागीदारी झाली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज अप्रभावी ठरल्याने रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने आक्रमक पवित्रा घेत संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 99 धवनची भागीदारी झाली. या दरम्यान, पंत आणि हार्दिकने शानदार वैयक्तिक अर्धशतक ठोकले. मात्र, सॅम करनला ही जोडी फोडण्यात यश आलं. जॉस बटलरने अचूकपणे पंतचा झेल पकडला. पंतने 62 चेंडूत 78 धावा ठोकल्या. पंत तंबूत परतल्यानंतरही हार्दिकने आपली फलंदाजी सुरूच ठेवली आणि अर्धशतकी धावसंख्या गाठली. पण बेन स्टोक्सने हार्दिक चा त्रिफळा उडवला आणि त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. हार्दिकने 44 चेंडूत 64 धावा केल्या. यानंतर, शार्दूलने पुन्हा एकदा बॅटने कमाल केली. शार्दूलने 30 धावा केल्या ज्यात 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. कृणाल पांड्या 25 धावा करून परतला.
दुसरीकडे, इंग्लंडकडून मलान आणि सॅम कुरनला वगळता आघाडीचे अन्य फलंदाजी प्रभावी कामगिरी करू शकले नाही. जेसन रॉयने 14 तर दुसऱ्या वनडे सामन्यातील शतकवीर जॉनी बेअरस्टो एकच धाव करू शकला. शिवाय, प्रभारी कर्णधार जोस बटलरने 15, मोईन अलीने 29 धावा केल्या. आदिल रशीदने 19 धावा करत सॅम कुरनसह सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सॅम कुरन धावा करून नाबाद परतला. सॅम कुरने संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या मात्र अखेर भारतीय गोलंदाजांनी धावसंख्येवर नियंत्रण घालत इंग्लंडवर शानदार विजय मिळवला.