IND vs ENG 2nd Test 2021: चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियमवर यजमान टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनीं दणदणीत विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. भारतीय संघाने रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर धमाकेदार कमबॅक केलं आणि मोठा विजय मिळवला. यासह टीम इंडियाने मालिकेत आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आव्हान कायम ठेवलं आहे. इतकंच नाही तर, विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून हा विजय मूल्यवान ठरला. टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्ध या विजयाने कोहलीने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील मोठ्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. विराट घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी विजय भारतीय कर्णधार म्हणून धोनीच्या बरोबरीवर पोहचला आहे.
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने घरच्या मैदानावर 30 पैकी 21 सामने जिंकले असून विराटने आता त्याची बरोबरी केली आहे. आणि इंग्लंडविरुद्ध विराटच्या कर्णधारपदी असताना टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमध्ये 28 सामन्यातील 21वा विजय ठरला. यासह या दोन्ही भारतीय क्रिकेटपटूंच्या नेतृत्वात संघाने सर्वाधिक आजवर सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. याशिवाय, विराटला संपूर्ण मालिकेत धोनीला मागे टाकत भारतात सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची देखील संधी आहे. इंग्लंडसह भारतीय संघाला अद्याप दोन कसोटी सामने खेळायचे आहेत, त्यामुळे तो आगामी सामन्यात धोनीला मागे टाकून देशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा कर्णधार बनण्यासाठी प्रयत्नशील असेल.