IND vs ENG 2nd ODI 2021: दुसऱ्या वनडेत ‘गब्बर’ शिखर धवनला मोठा विक्रम करण्याची संधी, ‘ही’ कामगिरी करणारा बनेल तिसरा वेगवान फलंदाज
शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd ODI 2021: इंग्लंड (England) संघाविरुद्ध पुणे येथे  झालेल्या वनडे मालिकेच्या सलामीच्या सामन्यात 98 धावांची तुफान खेळी करणारा भारतीय (India) ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6,000 धावा करणारा तिसरा वेगवान फलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे. मैलाचा दगड गाठण्यासाठी तो फक्त 94 धावा दूर आहे. 35 वर्षीय धवनने 137 एकदिवसीय डावात 5 शतके आणि 31 अर्धशतकांच्या जोरावर आजवर एकूण 5,906  धावा केल्या आहेत. “6,000 वनडे धावा करणारा गब्बर तिसरा वेगवान खेळाडू बनू शकतो. तेथे पोहोचण्यासाठी त्याला किती धावा आवश्यक आहेत याचा अंदाज बांधता येईल का?” भारत विरुद्ध इंग्लंडचे अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने एका ट्विट पोस्टमध्ये म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 6,000 धावांचा टप्पा गाठण्याचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या (Hashim Amla) नावावर ज्याने 123 डावात हा पराक्रम केला होता. (IND vs ENG ODI 2021: टीम इंडियाचा फॅन नंबर-1! कोहली अँड कंपनीला चीअर करण्यासाठी गहुंजे हिल्सवर पोहचला सचिन तेंडुलकरचा चाहता, पहा Photos)

आमलानंतर या एलिट यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने 6000 वनडे धावांचा डोंगर सर करण्यासाठी 136 डाव खेळले असून तो सर्वात वेगवान भारतीय आहे. न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन 139 वनडे डावांसह या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे, इंग्लंडविरुद्ध धवनचा हा 138 वा डाव असेल आणि त्याने या सामन्यात 94 धावा केल्या तर तो जगात तिसरा वेगवान तर दुसरा वेगवान भारतीय वेगवान ठरेल. भारतीय फलंदाजांमध्ये विराटनंतर या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान आहे. गांगुलीने 147 डावात यापूर्वी वेगवान सहा हजारी धावसंख्या पार करण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर, विराटने 136 डावात वनडे क्रिकेटमधील हा डोंगर सर करत टीम इंडिया दिग्गजांच्या यादीत मनाचे स्थान पटकावले होते.

दुसरीकडे, धवन हा टप्पा गाठणारा दहावा भारतीय फलंदाज ठरेल. सचिन तेंडुलकर, विराट , सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, रोहित शर्मा, युवराज सिंह, आणि वीरेंद्र सेहवाग यांचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. पाचपैकी चार टी-20 सामन्यांतून बाहेर बसवलेल्या धवनने वनडे सामन्यातून लय मिळवली. पहिल्या सामन्यातील आपल्या डावात डाव्या हाताच्या फलंदाजाने 11 चौकार आणि 2 षटकार लगावले.