IND vs ENG 1st Test Day 3: रिषभ पंत-चेतेश्वर पुजरा यांच्या अर्धशतकाने टीम इंडियाची गाडी रुळावर, दिवसाखेर 257 धावांवर भारताचा अर्धा संघ तंबूत
चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st Test Day 3: इंग्लंडने (England) चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडीयमवर केलेल्या 578 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने (Team India) तिसऱ्या दिवसाखेर 6 विकेट गमावून 257 धावा केल्या असून यजमान टीम पाहुण्या संघाच्या अद्याप 321 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) 33 धावा आणि आर अश्विन 8 धावा करून खेळत होते. आघाडीचे फलंदाजांनी इंग्लंड गोलंदाजांपुढे गुडघे टेकले तर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) जोडीने शतकी भागीदारी करत संघाची गाडी रुळावर आणली. पंतने 91 आणि पुजाराने 73 धावा केल्या. पंतने इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचला (Jack Leech) टार्गेट करत 5 षटकार खेचले. पाहुण्या संघाच्या या गोलंदाजाने दिवसाखेर एकही विकेट न घेता सर्वाधिक 77 धावा दिल्या. डॉम बेसने (Dom Bess) सार्वधिक 4 विकेट घेतल्या तर जोफ्रा आर्चरला 2 विकेट मिळाल्या. यापूर्वी, भारताकडून शुभमन गिलने 29, कर्णधार विराट कोहलीने 11, रोहित शर्माने 6 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे एक धाव करून माघारी परतला. (IND vs ENG 1st Test 2021: रिषभ पंतची टेस्टमध्ये T20 स्टाईल बॅटिंग, चेन्नई सामन्यात खेचले 4 तुफानी सिक्स, पहा व्हिडिओ)

पाचशे पार इंग्लंडला पहिल्या डावात आटोपल्यावर चेन्नई कसोटीत भारताने निराशाजनक सुरुवात केली. टॉप ऑर्डरच्या निराशाजनक खेळीनंतर मध्यक्रमातील फलंदाजही अपयशी ठरले. टीम इंडियाने 100 धावांच्या आत 4 विकेट्स गमावल्या. अशास्थितीत, पुजारा आणि रिषभच्या जोडीने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. टीम इंडिया अडचणीत असताना या दोघांनी निर्णायक क्षणी ही शतकी भागीदारी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. पंतने अवघ्या 40 चेंडूत 4 चौकार आणि तितकेच षटकार लगावत अर्धशतक ठोकले. पुजाराने शानदार डाव खेळला, परंतु वैयक्तिक 73 धावसंख्येवर दुर्दैवी झेलबाद झाला. पुजाराला डोम बेसने रोरी बर्न्सच्या हाती कॅच आऊट केलं. पुजाराने 143 चेंडूत 11 चौकारांसह 73 धावा केल्या. पुजारा पाठोपाठ पंतही शतकी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. पंतचे अवघ्या 9 धावांनी शतक हुकले आहे. पंतने 88 चेंडूत 9 फोर आणि 5 सिक्ससह 91 धावांची खणखणीत खेळी केली.

तिसर्‍या दिवशी 8 बाद 555 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली आणि खेळाच्या पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराह आणि अश्विनने 3 विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडच्या कर्णधाराने 218 धावांची शानदार खेळी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.