शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test Day 5: टीम इंडियाचा (Team India) युवा सलामी फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गिलने ब्रिस्बेन टेस्टच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी सुनील गावस्करचा (Sunil Gavaskar) 50 वर्ष जुना विक्रम मोडला आणि रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. गिल भारताच्या कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात 50 हुन अधिक धावा करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे आणि त्याने या बाबतीत लिटल मास्टर गावस्करला मागे टाकले. गिलने वयाच्या 21 वर्ष 133 दिवसांत हा कारनामा केला आहे. 1970-71 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात गावस्कर यांनी 21 वर्ष 243 दिवसात चौथ्या डावात नाबाद 67 धावा केल्या होत्या. गिलचा हा तिसरा कसोटी सामना आहे आणि या मॅचमध्ये त्याने आपल्या कसोटी करिअरमधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. यापूर्वी या दौर्‍यात गिलने सिडनी टेस्ट सामन्यात 50 धावा केल्या होत्या. (IND vs AUS 4th Test Day 5: शुभमन गिलचा अर्धशतकी धमाका, ब्रिस्बेनच्या दुसऱ्या डावात लंचपर्यंत टीम इंडिया 83/1)

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अ‍ॅडिलेडच्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात पृथ्वी शॉच्या अपयशानंतर शुभमनला मेलबर्न कसोटी सामन्यातून पदार्पणाची संधी मिळाली. शुभमनने सिडनी टेस्टमधून आंतरराष्ट्रीय कमबॅक करणाऱ्या रोहित शर्मासोबत दोन्ही डावात अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, ब्रिस्बेनच्या पहिल्या दोन्ही डावात ही सलामी जोडी अपयशी ठरली. पहिल्या डावात दोघांमध्ये 11 तर दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी 18 धावांची भागीदारी झाली. शुभमची ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. टीम इंडियाने यापूर्वी या युवा फलंदाजावर पृथ्वी शॉ याला सतत संधी दिली, मात्र मुंबईकर फलंदाजाच्या अपयशांनंतर अखेर शुभमनला संधी मिळाली ज्याने त्याचा फायदा घेतला आणि आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहे. शुभमन तिसरा कसोटी सामना खेळत असून आतापर्यंत 200हुन अधिक धावा केल्या आहेत.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीजबद्दल बोलायचे तर टॉस जनकुन पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 369 धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल भारताने पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारू शकली. 33 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांवर संपुष्टात आला आणि अशाप्रकारे भारताला विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य मिळाले.