IND vs AUS 4th Test Day 5: शुभमन गिलचा अर्धशतकी धमाका, ब्रिस्बेनच्या दुसऱ्या डावात लंचपर्यंत टीम इंडिया 83/1
शुभमन गिल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 4th Test Day 5: ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा मैदानावर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यात सामन्याच्या अंतिम दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने (Team India) दबदबा कायम ठेवला आणि 38 ओव्हरमध्ये लंचपर्यंत 1 विकेट गमावून 83 धावा केल्या. अशाप्रकारे संघाला विजयासाठी उर्वरित दोन सत्रात 245 धावांची गरज असून त्यांच्याकडे अद्याप 9 विकेट शिल्लक आहे. दुपारच्या जेवणाची घोषणा झाली तेव्हा शुभमन गिल (Shubman Gill) 64 धावा आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 8 धावा करून खेळत होते. शुभमनने मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक ठोकले आणि संघाला पहिल्या सत्रात मजबुती मिळवून दिली. रोहित शर्माला 7 धावांवर बाद करत पॅट कमिन्सने (Pat Cummins) कांगारू संघाला दिवसाचे पहिले यश मिळवून दिले. यजमान संघाचा दुसरा डाव 294 धावांवर संपुष्टात आला आणि भारतीय संघाला विजयासाठी 328 धावांचे तगडे लक्ष्य मिळाले. (IND vs AUS 2020-21 Series: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर या 5 भारतीय खेळाडूंनी घेतली गरुडझेप, अकल्पनीय कामगिरी पाहून सर्वांना केले चकित)

चौथ्या दिवशी पावसामुळे वाया गेलेल्या अंतिम सत्रात टीम इंडियाने बिनबाद 4 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाचव्या आणि अंतिम दिवशी रोहित आणि शुभमन पहिल्या सत्रात संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. टीमला 18 धावसंख्येवर कमिन्सने पहिला धक्का दिला आणि रोहितला विकेटच्या मागे कर्णधार टिम पेनकडे कॅच आऊट करत माघारी धाडलं. त्यांनतर, शुभमनने पुजारासह 143 चेंडूत अर्धशतकी भागीदारीत करत डाव सावरला. पुजारा संथ खेळी करत असताना शुभमनने आक्रमकता आणि सावधगिरीच्या मिश्रणाने फलंदाजी केली. शुभमनने आपल्या खेळीत चेंडूत 5 चौकार लागले तर पुजाराने चेंडूंचा सामना केला आहे. शुबमनने पुजारासमवेत डाव पुढे नेला आणि या दौर्‍यावर आपले दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने 90 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी या 21 वर्षीय युवा सलामी फलंदाजाने सिडनीच्या दुसऱ्या डावात 50 धावांचा अर्धशतकी खेळी केली होती.

दरम्यान, ब्रिस्बेन टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात यजमान संघाने 369 धावांपर्यंत मजल मारली तर प्रत्युत्तरात टीम इंडियाने 336 धावसंख्या गाठली. अशाप्रकारे कांगारू संघाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 108 धावा केल्या, मात्र वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरच्या शतकी भागीदारीपुढे ते व्यर्थ ठरले.